पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते. भंटिडा एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर ऐवजी त्यांना रस्तेमार्गे जायचं होतं. त्यांना सर्वात आधी हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जायचं होतं. मात्र, त्यापूर्वीच अर्धा तासआधी एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला. काही आंदोलकांनी रस्ता रोको केला होता. त्यामुळे या ताफ्याला सुरक्षेच्या कारणास्तव माघारी परतावे लागले होते. त्यावर मोदींनी संताप व्यक्त केला. मी जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेची पंजाब सरकारने गंभीर दखल घेतली असून फिरोजपूरच्या एसएसपीला निलंबित करण्यात आलं आहे
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. ‘पंजाब सरकारने दाखवून दिलं की ते विकासविरोधी आहेत आणि आपल्या स्वातंत्र्यसेनानींबद्दल त्यांच्या मनात आदर नाही. ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील एक मोठी चूक होती. हे खूप चिंताजनक आहे. पंतप्रधान मोदी हे देशाचे सुपुत्र सरदार भगतसिंह आणि अन्य शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणार होते. सोबतच राज्यातील प्रमुख विकासकामांचं भूमिपूजन ते करणार होते’, असं नड्डा यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी नड्डा यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. ‘प्रिय नड्डाजी, पंतप्रधान मोदी यांची रॅली रद्द होण्यामागे मुख्य कारण हे रिकाम्या खुर्च्या होतं. विश्वास बसत नसेल तर हे पाहा. अर्थहीन भाषणबाजी नको. शेतकरी विरोधी मानसिकतेचं सत्य स्विकारा आणि आत्मचिंतन करा. पंजाबमधील जनतेनं रॅलीपासून दूर राहत अहंकारी सत्तेला आरसा दाखवला आहे’, अशी घणाघाती टीका सुरजेवाला यांनी केलीय.
आपल्या पंजाब दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी एक ट्वीट करुन आपल्या दौऱ्याबाबत माहिती दिली होती. ‘मी आज पंजाबमधील माझ्या बहिण आणि भावांमध्ये असेल. फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात 42 हजार 750 कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी केली जाईल. या प्रकल्पांमुळे लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल’, असं ट्वीट मोदी यांनी केलं होतं.