पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती यांची
भेट घेऊन दिली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याला पंजाबमध्ये अडवण्यात आल्यानंतर ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’चं कारण देत पंतप्रधानांनी पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन नक्की काय घडलं यासंदर्भातील माहिती दिल्याचं ट्विट राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.
विमानातील तब्बल १२५ जण
पॉझिटीव्ह आढळले
देशात आज ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे करोना रुग्णांचा मोठा स्फोट झाला आहे. देशात गेल्या २४ तासांत देशात करोना संसर्गाचे ९० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा मागील दिवसाच्या तुलनेत ५६ टक्क्यांहून अधिक आहे. यादरम्यान ओमाक्रॉनच्या बाधितांचा आकडा २६०० च्या पुढे गेला आहे. देशात सक्रिय प्रकरणांमध्येही मोठी वाढ झाली आहे. याच दरम्यान आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. पंजाबमध्ये एका विमानातील तब्बल १२५ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत.
राज ठाकरे यांच्याविरोधात
न्यायालयाचे अटक वॉरंट जारी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळीमधील न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. येथील प्रथम वर्ग परळी वैजनाथ दिवाणी न्यायालयाने (क स्तर) हे वॉरंट जारी केलं आहे. सतत तारखेला गैरहजर राहिल्याने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येत असल्याचं न्यायलायने म्हटलं आहे. केस क्रमांक आर. सी. सी. १४०००३८/२००९ प्रकरणी परळी वैजनाथ न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीमध्ये जामीन दिल्यानंतरही राज ठाकरे न्यायलयासमोर हजर राहिले नसल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
पोलिसांसाठी ‘वर्क फ्रॉम
होम’ करता येणार
राज्याचा गृहविभागाने पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला असून त्यांनाही खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येणार आहे. पोलिसांना करोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
नाट्यगृह, थिएटर बंद, मॉल बंद
करायची आवश्यकता वाटत नाही
करोनानंतर तब्बल दोन वर्षांनी चित्रपटगृह सुरु झाले आहेत. त्यातच आता ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतंच याबाबत अमित देशमुख यांनी माहिती दिली आहे. यावर अमित देशमुखांनी सध्या तरी नाट्यगृह, थिएटर बंद, मॉल बंद करायची आवश्यकता वाटत नाही, असे सांगितले आहे.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे
प्रवाशांवर निर्बंध लागू नाहीत
मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान राजेश टोपे यांनी देखील याला दुजोरा दिला असून मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार सरकारसमोर नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यांनी जिल्हांतर्गत बंदी लावण्याचाही राज्य सरकारचा कोणता विचार नाही अशी माहिती दिली. लॉकडाउन लावण्याचा कोणताही विचार नसल्याचा पुनरुच्चार केला.
हळदीच्या दराने क्विंटलमागे
३ हजार ८५० रुपयांची घेतली उसळी
हळदीच्या व्यापारावर पाच टक्के जीएसटी लागू केल्यानंतर सांगलीच्या बाजारात गेल्या आठवडय़ात उतरलेल्या हळदीच्या दराने क्विंटलमागे तब्बल ३ हजार ८५० रुपयांची उसळी घेतली आहे. बुधवारी झालेल्या सौद्यामध्ये हळदीला १८ हजार रुपयांचा सर्वोच्च दर मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले. हळद शेतमाल नसल्याचा दावा करीत महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणाने डिसेंबरच्या अंतिम आठवडय़ामध्ये जाहीर केला होता.
राज्यात कोरोनाचा विळखा,
26 हजार 538 रुग्ण आढळले
राज्यात ओमिक्रॉन आणि कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज कोरोना रुग्णांचा आकडा 26 हजारांच्या पार गेला आहे. गेल्या 24 तासात तब्बल 26 हजार 538 रुग्ण कोरोना आढळून आले आहेत, तर राज्यात आज ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज 8 करोना बाधित रुग्णाांच्या मत्युंंची नोंद झाली आहे. कोरोनाची ही स्फोटक वाढ धडकी भरवणारी आहे. राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
BOSCH कंपनीला दणका,
730 कामगारांना घेण्याचे आदेश
ऐन दिवाळीत 730 कामगारांना घरचा रस्ता दाखवणाऱ्या BOSCH कंपनीला कामगार न्यायालयाने जोरदार दणका देत त्यांना कामावर घ्या किंवा काम द्या, असे आदेश दिले आहेत. कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात 400 कामगारांनी नाशिकच्या कामगार न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हे आदेश दिले.
सिंधुताईंच्या कन्या ममता
सपकाळ वारसा पुढे नेणार
अनाथांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करून त्यांना केवळ निवारा आणि शिक्षणच नाही तर मायेची सावली देणाऱ्या सिंधुताई सपकाळ या आता आपल्यात राहिल्या नाहीत. त्यांच्या निधनामुळे देशाच्या सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनामुळे तर अनाथांवर जणू डोंगरच कोसळला आहे. त्यांचे भावविश्वच हरपून गेलं आहे. सिंधुताई यांच्या नंतर अनाथांची माय कोण? असा सवाल केला जात आहे. सिंधुताईंच्या कन्या ममता सपकाळ या सिंधुताईंचा वारसा पुढे नेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
विश्वचषकातील भारताचा पहिला
सामना पाकिस्तानविरुद्ध
बीसीसीआयने यावर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व मिताली राज करणार आहे. तर हरमनप्रीत कौरला संघाची उपकर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना ६ मार्च रोजी बे-ओव्हल तौरंगा येथे होणार आहे. हा १५ सदस्यीय संघ विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांची वनडे मालिका खेळेल. या मालिकेतील पहिला सामना ११ फेब्रुवारीला होईल.
SD social media
9850 60 35 90