डेव्हिड बेकहॅम, सलमानपासून ते नीता अंबानीपर्यंत भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी दिग्गजांची हजेरी
जेव्हा आपण क्रिकेट विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला २०१९चा पराभव, धोनीचे अश्रू, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे निराश चेहरे आठवतात. आज बदला घेण्याची ही योग्य संधी आहे. आज क्रिकेट विश्वचषक २०२३चा उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. आजच्या सामन्यासाठी डेव्हिड बेकहॅम पासून ते मनोरंजन क्षेत्रातील स्टार्सपर्यंत सर्वांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे.भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीचा सामना पाहणाऱ्यांमध्ये सर्वात मोठे नाव म्हणजे इंग्लंडचा महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम, तो सध्या भारतात आहे. नुकताच तो गुजरातमध्ये गेला होता, तो आजचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आला आहे. तसेच, अनेक बॉलिवूड स्टार्सही स्टेडियममध्ये दिसणार आहेत. रजनीकांत, सलमान खान, आमिर खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग स्टेडियममध्ये दिसत आहेत. मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानीही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहचल्या आहेत.
फक्त सचिनचा विक्रम मोडला नाही, विराटने अपयशाचा कलंक पुसला
भारताची रन मशिन अशी ओळख असलेल्या विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्डकप २०२३च्या सेमीफायनल मॅचमध्ये वनडे करिअरमधील विक्रमी ५०वे शतक झळकावले. विराटने सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मागे टाकला.विराटच्या या विक्रमी शतकी खेळीत अनेक विक्रमांची नोंद झाली. सचिनच्या शतकांचा विक्रम मागे टाकताना विराटने त्याचा आणखी एक रेकॉर्ड मोडला. एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिनच्या नावावर होता. हा विक्रम आता विराटच्या नावावर झाला आहे. विराटने सचिनचा २००३ मधील ६७३ धावांचा विक्रम मागे टाकला. विराटने ११३ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकारांसह ११७ धावा केल्या.
भारताने सेमी फायनलच्या विजयाचा रचला भक्कम पाया, कोहली-श्रेयसच्या शतकाने धावांचा डोंगर
विराट कोहलीचे महाशतक आणि श्रेयस अय्यसच्या शतकांच्या जोरावर भारताने सेमी फायनच्या विजयाचा भक्कम पाया रचला आहे. कोहलीने यावेळी आपले ५० वे शतक साजरे करत सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. कोहली बाद झाल्यावर श्रेयसने आपले शतक साजरे केले. त्यामुळेच भारताने या सामन्यात धावांचा डोंगर रचला आणि त्यामुळे त्यांनी विजयाचा पाया रचल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने यावेळी ११३ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ११७ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. श्रेयसने यावेळी ७० चेंडूंत १०५ धावांची धमाकेदार शतकी खेळी साकारली. भारताने यावेळी ३९७ धावा करत विजयाचा पाया रचला.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे अडचणीत, नाशिक पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतलं
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अद्वय हिरे अडचणीत आले आहेत. अद्वय हिरे यांना मध्यप्रदेशातल्या भोपाळमधून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रेणूका सुत गिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.अद्वय हिरे यांच्या रेणुका सूतगिरणी संस्थेच्या नावाने जिल्हा बँकेतून ७.४६ कोटी कर्ज घेतले होते, सदर कर्जाची रक्कम संस्थेसाठी न वापरता त्या रकमेचा गैरवापर वापर केला म्हणून नाशिक जिल्हा बँकेने हिरे विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने हिरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.त्यानंतर हिरे फरार झाले होते, आज पोलिसांनी त्यांना मध्यप्रदेशातून ताब्यात घेतलं आहे.
शेवटच्या क्षणी पाणी पाजायलाही कोणी नव्हतं… कुटुंबासाठी किती संपत्ती मागे सोडून गेले ‘सहाराश्री’?
लोकांना श्रीमंतीचे स्वप्न दाखवणारे आणि बचतीचे महत्त्व समजवून देणाऱ्या सुब्रत रॉय उर्फ सहाराश्री यांचे निधन झाले. दीर्घ आजाराशी लढा दिल्यानंतर सुब्रत रॉय यांनी मंगळवारी मुंबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोट्यवधींचा व्यवसाय उभारणाऱ्या सहकारश्री यांच्यासोबत शेवटच्या क्षणी कोणीही नव्हते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र अखेरच्या क्षणी ते एकटे पडले होते. त्यांनी पत्नी आणि दोन मुले सुशांतो व सीमांतो परदेशात स्थायिक आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुब्रत रॉय सहारा यांच्या कुटुंबाने मॅसेडोनियाचे नागरिकत्व घेतले असून त्यांच्यानंतर सहाराची एवढी मोठी संपत्ती कोण सांभाळणार, सुब्रत रॉय यांनी आपल्या मागे किती संपत्ती सोडली? सहारश्रीनंतर आता सहाराची सूत्रे कोणाकडे जाणार याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सौदे, राजापुरी हळदीला झळाळी,१७ हजारांचा विक्रमी दर, शेतकऱ्यांना दिलासा
सांगलीच्या वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हळदीचे सौदे काढण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून हळदीला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. यावर्षी मात्र उत्पादन आणि आवक कमी झाल्याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. सांगलीत दिवाळी पाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये राजापुरी हळदीला १७ हजार १०१ रुपये दर प्रतिक्विंटलला मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
शरद पवार-अजित पवारांच्या गाठीभेटी, राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाल्यापासून दोन्ही गटांमधील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. अजित पवार गटातील नेते थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य करत आहेत. दोन्ही गटात तणाव निर्माण झालेला असताना शुक्रवारी (१० नोव्हेंबर) अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. शरद पवारांचे बंधू आणि उद्योगपती प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली. त्यापाठोपाठ मंगळवारी (१४ नोव्हेंबर) दिवाळी पाडव्यानिमित्त अजित पवार यांनी शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत आयोजित पवार कुटुंबाच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तर बुधवारी भाऊबीजेनिमित्त शरद पवार यांनी अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवास्थानी हजेरी लावली.
जम्मूमध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ३६ जण ठार
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. जम्मूहून किश्तवाडला जाणारी बस दरीत कोसळून ३६ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दरीत कोसळलेल्या बसमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने बचाव मोहीम हाती घेतली आहे. या बसमधून ५५ जण प्रवास करत होते. जम्मूवरून किश्तवाडला जात असताना बस डोडाजवळ पोहोचली. या भागात खूप उंचावर आणि वळणावळणाचे रस्ते आहेत. त्याचदरम्यान बस दरीत कोसळली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल आणि प्रियंका गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. या दोन्ही नेत्यांना कारणे दाखवा नोटी बजावण्यात आली आहे.भाजपा नेत्यांनी प्रियंका गांधींविरोधात तक्रार केली होती. त्यात असं म्हटलं होतं की प्रियंका गांधींनी मध्य प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी काही वक्तव्यं केली होती. त्याला सत्याचा कुठलाही आधार नव्हता ती वक्तव्यं खोटी होती. खासगीकरणावरुन त्यांनी हे आरोप केले होते. त्यावरुन प्रियंका गांधींना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे.
अखेर मुहूर्त सापडला! टाटांचा ‘हा’ IPO पुढील आठवड्यात उघडणार
जवळपास २० वर्षांनंतर टाटा ग्रुप कंपनीचा IPO येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Tata Technologies चा IPO २२ नोव्हेंबर २०२४ रोजी उघडत आहे. तर गुंतवणूकदार २४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सदस्यता घेऊ शकतात. बाजारातील गुंतवणूकदार टाटाच्या या IPO ची आतुरतेने वाट पाहत आहेत. टाटा टेक्नॉलॉजीज ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे आणि या IPO द्वारे समूहाने तिला स्वतंत्र कंपनी म्हणून सूचीबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्हीसुद्धा या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला या IPO (Tata Technologies IPO) च्या तपशीलांची माहिती देणार आहोत.
SD Social Media
9850603590