आज दि.२६ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

शिंदे सरकारकडून गणेशभक्तांसाठी Good News : कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे. मुंबई-गोवा आणि मुंबई बंगळुरु महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना ही सूट देण्यात आली आहे. 27 ऑगस्ट 2022 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत ही टोलमाफी देण्यात आली आहे.

राष्ट्रकुल पदकविजेत्यांसाठी गुड न्यूज! बक्षिस रकमेत राज्य सरकारकडून घसघशीत वाढ

बर्मिंगहॅमच्या  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी यंदा दमदार कामगिरी बजावली. महत्वाचं म्हणजे यात महाराष्ट्राचे 14 क्रीडापटू सहभागी झाले होते. त्यापैकी सात खेळाडूंनी वैयक्तिक किंवा सांघिक प्रकारात पदक जिंकण्याचा पराक्रम गाजवला. महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर झळकवणाऱ्या याच पदकविजेत्या खेळाडूंचा राज्य सरकारनं गौरव केलाय. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी पदकविजेत्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत वाढ केली असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे राष्ट्रकुल पदकविजेत्यांना आता घसघशीत रक्कम बक्षिस स्वरुपात मिळणार आहे.

नाशिकमध्ये बड्या अधिकाऱ्याच्या घरात पैशांचं घबाड! शंभर कोटींच्या मालमत्तेचा संशय

नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (25 ऑगस्ट) धडाकेबाज कारवाई केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीने काल एका बड्या अधिकाऱ्याला तब्बल 28 लाखांची रोख रकमेची लाच घेताना रंगेहात पकडलं होतं. एसीबीच्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. एसीबी अधिकाऱ्यांनी आरोपी अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्यानंतर या अधिकाऱ्याकडे शंभर कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असल्याची भीती वर्तवली जात होती. त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासाला सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे एसीबीने आतापर्यंत केलेलेल्या कारवाईत जवळपास दीड कोटींपर्यंतची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एसीबी अधिकाऱ्यांकडून अजूनही तपास सुरु आहे.

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना अटक केली होती. बागुल यांनी सेंट्रल किचन बिल मंजुरीसाठी एका ठेकेदाराकडे तब्बल 28 लाखांची लाच मागितली होती. दीड कोटी रुपयांचं बिल मंजूर करण्यासाठी या अधिकाऱ्याने बिलाच्या रकमेच्या 12 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. अखेर एसीबी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कारवाई करत बागुल यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अनिल कपूर यांनी नातवाचे केले जँगी स्वागत; मिठाई वाटत साजरा केला आनंद

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि अनिल कपूर यांची लेक सोनम हिने २० ऑगस्ट रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. सोनम कपूर आणि आनंद आहुजा हे दोघे चित्रपटसृष्टीतील सर्वात नवीन पालक आहेत. या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. डिलिव्हरीनंतर सोनम आणि तिचे बाळ दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले होते. आणि आज सोनम आपल्या बाळाला घेऊन घरी परतत असल्याचं दिसतंय. तिची कार हॉस्पिटलमधून निघतानाची छायाचित्रे समोर आली आहेत. तसेच नवीन याकोब झालेले अभिनेते अनिल कपूर  प्रचंड उत्साही असल्याचं पाहायला मिळतंय. या सोनमच्या चिमुकल्याचं शानदार स्वागत करण्यात आलं आहे.

भररस्त्यात सुनील तटकरे अन् मंत्री रवींद्र चव्हाण समोरासमोर! खड्ड्यांवरुन टोलवा-टोलवी

गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्ंयावरुन राजकारण सुरू आहे. यात आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण आमने-सामने आले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. यावेळी महामार्गावरच कामाच्या ठिकाणी त्यांची आणि खासदार सुनिल तटकरे यांनी भेट झाली. चव्हाण हे दौऱ्याच्या वेळेपेक्षा जलद आल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटल्यानंतर हे गतिमान सरकार आहे, असा टोला रवींद्र चव्हाण यांनी लगावला. तर सरकार आमचे होते ते देखील गतिमान होतं. हे सरकार तर प्रचंड गतीमान आहे. गेली 40 वर्ष जनतेत काम करत आहे. रस्त्याचा विषय हा राजकारण करण्याचा नाही, असं प्रतित्युत्तर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी दिलं.

हृदयाचा पुणे ते सुरत प्रवास; मराठी माणसाने दिले गुजराती व्यक्तीला जीवनदान

गुजरातच्या सुरत शहरात असणाऱ्या महावीर रुग्णालयात अवघड अशी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. गुजरातच्या छोटा उदेपूर गावातल्या एका 35 वर्षीय व्यक्तीच्या शरीरात या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून पुण्यातल्या एका 28 वर्षीय ब्रेन-डेड तरुणाचं हृदय बसवण्यात आलं. सुरतमध्ये पार पडलेली ही पहिलीच आंतर-राज्यीय हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘सर्जा-राजा’सह बळीराजाचाही मृत्यू; बैल पोळ्याच्या दिवशी घरावर पसरली शोककळा

एकीकडे राज्यात बैल पोळ्याचा सण साजरा होत असताना दोन वाईट बातम्या समोर आल्या आहेत. एक बातमी वर्धा जिल्हा तर दुसरी बातमी ही औरंगाबाद जिल्ह्यातून आली आहे. वर्धा जिल्ह्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे गोठ्याला अचानक आग लागली. या दुर्घटनेत दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला आहे.बैल पोळ्याच्या दिवशी गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. तर गोठ्यातील विविध साहित्याची राखरांगोळी झाल्याने शेतकऱ्यांचे तब्बल तीन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे घडली. धनोडी (बहाद्दरपूर) येथील शेतकरी सतीश रामकृष्ण सोनवणे यांनी गावाशेजारील गोठा उभारला आहे. या गोठ्यात जनावरांसह जनावरांचे वैरण आणि शेतीउपयोगी विविध साहित्य ठेवले जायचे.

Admition घेताना सावधान! UGC च्या अहवालात धक्कादायक माहिती समोर, ही २१ विद्यापीठं फेक

विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. UGC ने तब्बल २१ विद्यापीठ बोगस असल्याचा अहवाल सादर केला आहे. या २१ विद्यापिठांची यादी देखील जाहीर केली आहे. त्यामुळे अॅडमिशन घेताना सावध राहण्याचा सल्ला देखील यावेळी विद्यार्थी आणि पालकांना दिला आहे.

देशातील तब्बल २१ विद्यापीठांनी UGC कलम १९५६ च्या नियमांच उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. या बोगस संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापासून सावध राहा. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं असं निवेदनात म्हटलं आहे.

गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला जम्मू-काश्मीरमधून मोठा धक्का!

गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या वृत्तानंतर जम्मू-काश्मीर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे जुने आणि जाणते जेष्ठ नेते आज काँग्रेस सोडून बाहेर पडत आहेत. यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गुलाम नबी आझाद यांच्यात काही कारणांवरून वादाचे प्रसंग ओढवले होते. त्यामुळे गुलाम नबी आझाद काहीसे नाराज देखील असल्याचं समजत आहे.

नितीन गडकरींची मोठी घोषणा, वाहनचालकांना मिळणार दिलासा

सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि कार्स उपलब्ध आहेत. इंधनाचे वाढते दर आणि वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांनी या वाहनांचा वापर वाढवावा, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सरकारच्या या प्रयत्नांना नागरिकांकडून काही प्रमाणात प्रतिसादही मिळतो आहे; पण इलेक्ट्रिक कार असो अथवा स्कूटर या दोन्ही वाहनांच्या किमती जास्त असल्याने या वाहनांच्या खरेदीसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. जास्त किमतींमुळे ग्राहक इच्छा असूनही या वाहनांकडे वळताना दिसत नाहीत.’येत्या एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांइतक्या होतील,’ असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच एका कार्यक्रमात केलं. ‘भारतात येणारा काळ हा इलेक्ट्रिक मोबिलिटीचा आहे,’ असं देखील गडकरी यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केलं. गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.