अतिशय किरकोळ कारणावरुन वाद किंवा हाणामारी झाल्याची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली किंवा ऐकली असतील. मात्र, अनेकदा हे वाद इतके टोकाला पोहोचतात की यातून गंभीर हल्ले तसंच हत्या अशा घटनाही घडतात. नागपुरमधून सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात किरकोळ कारणामुळे एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला आहे.
या घटनेत पायाचा धक्का लागल्याने ट्रेनमध्ये वाद सुरू झाला. या वादात एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून खाली फेकलं. त्यात या प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना नागपूरच्या बुट्टीबोरी ते गुमगाव स्थानकादरम्यान घडली आहे. गरीबरथ या ट्रेनमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
या घटनेत अकोल्यावरून नागपूरचा उर्स बघण्यासाठी येत असलेला प्रवासी शेख अकबर याचा मृत्यू झाला आहे. मृतकासोबत असलेल्या सह प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून संशयित आरोपी शेख अब्बास याला अटक करण्यात आली आहे.