आज दि.३ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

महाविकास आघाडीची तज्ज्ञांची कमिटी तयार, राज्यसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी रणनीती ठरली

राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत सुरुवातीला राज्यसभेच्या संख्याबळाच्या गणितावर चर्चा झाली. मतांची जुळवाजळव करण्यासाठी तज्ज्ञ कमिटी ठरविण्यात आली आहे. ही कमिटी पक्षांना मतदान कसे करायचे याबाबत मार्गदर्शन करणार आहे. या बैठकीत घटक पक्षांबाबतही चर्चा झाली. विशेष म्हणजे आपली मतं फुटणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे, असा सूर बैठकीत होता. राज्यसभेच्या निवडणुकीच्या संख्या बेरजेचं गणित जुळल्यानंतर पक्षांनी व्हीप काढत आपल्या पक्षातील आमदारांची काळजी घ्यायची हे बैठकीत ठरविण्यात आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारत-दक्षिण आफ्रिका T20 वर संकट, मॅच रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जूनपासून 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे, पण या सीरिजची कटकमध्ये होणारी दुसरी टी-20 मॅच संकटात सापडली आहे. कटकमध्ये होणारा हा सामना रद्द करावा यासाठी ओडिशाच्या उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 12 जून रोजी कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.

बाराबती स्टेडियममध्ये 44 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे, पण स्टेडियमची फायर सेफ्टी म्हणजेच आग नियंत्रण सुरक्षा ओडिशा सरकारच्या आग नियंत्रण आणि आग सुरक्षा नियम 2017 ला धरून नाही, असा दावा या जनहित याचिकेमध्ये करण्यात आला आहे. ओडिशाच्या संजय कुमार नाईक यांनी ही याचिका दाखल केली आहे. 

औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतरण अटळ? चंद्रकांत खैरेंचं मोठं विधान

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या नामांतरणाबाबत मोठं विधान केलं आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या नामांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असा मोठा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. नामांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर औरंगाबादला संभाजीनगर तर उस्मानाबादला धाराशिव अशी ओळख दिली जाईल, अशी माहिती खैरे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी कानपूरमध्ये राडा

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूर दौऱ्यावर आहेत. ते कानपूरमध्ये दाखल झाले आहेत. पण त्यांच्या दौऱ्याआधीच एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. कानपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी मोठा राडा झाला आहे. दोन समाजात वादाची ठिणगी पडल्यानंतर हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. ते व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. त्या व्हिडीओमध्ये दोन गट एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहेत.

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी डबल खूशखबर; प्रमोशन होणार आणि पगारही वाढणार?

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा लाखो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत. कारण जुलैमध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बीड : आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेल्या दोघींचा वाळू उपशासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू

गोदावरी नदीपात्रातील पाण्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन मावस बहिणींचा वाळू उपशासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथे शुक्रवारी घडली. मृत दोघींपैकी एक मन्यारवाडी (ता.गेवराई) तर दुसरी आनंदवाडी (ता.परतूर जि.जालना) येथील रहिवासी असून त्या सुटीत मावशीकडे आल्या होत्या.

बीड जिल्ह्यातील महातपुरी येथे ३ जून रोजी दीपाली गंगाधरराव बरबडे (वय २०) आणि स्वाती अरुण चव्हाण (वय १२) या दोघींचा गोदावरी नदीपात्रातील खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे सह सयाजी शिंदेंच्या अभिनयाचा तडका; ‘झोलझाल’ चा टिझर आऊट

मराठीत सध्या एकाहून एक भन्नाट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातील एक चित्रपट म्हणजे झोलझाल कुशल बद्रिके ,भारत गणेशपुरे ,सयाजी शिंदे यांसारख्या धमाकेदार कलाकारांनी भरलेल्या या चित्रपटाचा म्युझिक लाँचिंग सोहळा नुकताच पार पडला. त्याचप्रमाणे चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित झाला आहे. हास्याची मेजवानी घेऊन येत्या १ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.   मल्टीस्टारर अशा या चित्रपटात हास्याचे विविध रंग विविध कलाकारांच्या अभिनयातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाळवे, अभिनेत्री प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे सिनेकलाकार दिसणार असून या कलाकारांच्या भूमिका या निव्वळ पर्वणीच ठरतील यांत शंकाच नाही.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.