मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे अयोध्येतील राम जन्मभूमीचं दर्शन घेतील. यानिमित्ताने शिवसेनेकडून एक टीजर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ असं म्हटलंय. अयोध्या दौऱ्यानतंर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात शिवधनुष्य यात्रा सुरू करणार आहेत.
शिवसेनेनं जारी केलेल्या टीजरमध्ये राज्यात सुशासन असावं आणि रामराज्यात शासक नाही तर सेवक असावा असं म्हटलं आहे. जनताच कुटुंब असावी आणि मानवाची सेवा हीच सर्वात महत्वाची असावी. जिथे अन्यायाच्या विरोधात आवाज उठेल आणि भगवा कधीच खाली येणार नाही. कणाकणात राम असावा अशी वाक्येही या टीझरमध्ये आहेत.
मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरून एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. ९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री शिंदे हे पक्षाचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्या हा आमच्यासाठी भावनेचा, श्रद्धेचा विषय आहे. राजकारण म्हणून या विषयाकडे पाहणार नाही असेही ते म्हणाले होते.
अयोध्येत राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि पंतप्रधान मोदी ते पूर्ण करतायत. यात खारीचा वाटा म्हणून सागाची लाकडे आम्ही मंदिरासाठी पाठवली आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी चांदीची वीट पाठवली होती. त्यामुळे अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं होतं.