“राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान करून आम्हाला सावरकर घराघरात पोहोचवण्याची व तरुणांपर्यंत घेऊन जाण्याची संधी दिली त्यामुळे तुम्हाला धन्यवाद. ‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’. करा पक्ष बरबाद”, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राहुल गांधींवर टीका केली. सावरकर गौरव यात्रेच्या वेळी ते बोलत होते.
सावरकर यांच्याबद्दल माहिती नसताना, सावरकर यांनी माफी मागितली, असे राहुल गांधी म्हणतात. त्यांनी अक्षम्य चूक केली आहे. त्यांनी मनाचा मोठेपण दाखवत देशाची माफी मागितली पाहिजे. पण ते मागणार नाही. त्यांना सावरकरांचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला. असा अपमान करून त्यांनी स्वतःचेही नुकसान केले आहे. सावरकर, शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. त्यांचे स्थान आई-वडिलांपेक्षाही मोठे आहे. आम्ही जातीवादी नाही, जातीभेद मानणारे नाही. आम्ही सर्वसमावेशक आहे. हे दुर्दैवी आहे की, सावरकरांबद्दल पुरेशी माहिती नसताना आणि इतिहासाची माहिती नसताना त्यांच्याबद्दल बोलले जाते, असे गडकरी म्हणाले.
राजकारणात आम्ही मंत्रिपद आणि लाल दिव्याच्या गाडीसाठी आलो नाहीत. आम्ही विचारासाठी राजकारणात आलो. काही झाले तरी विचारधारा सोडणार नाही, असेही गडकरी म्हणाले.