कोरोनामुळे सलग दुसरे शैक्षणिक वर्ष शाळा बंद आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून शाळा सुरु आहेत. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र नांदगाव तालुक्यातील चांदोरे या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी कोरोना काळातील सुट्टीचा सदुपयोग केल्याचे पहायला मिळाले. कोरोना सुट्टीमध्ये जीर्ण झालेल्या शाळेची दुरुस्ती करून तिला नवे स्वरूप देण्याचे काम शिक्षक आणि ग्रामस्थांनी केले आहे. यासाठी शिक्षकांनी आपसात वर्गणी गोळा केली. शिक्षकांची धडपड पाहून ग्रामस्थ देखील मदतीला धावून आले. त्याचबरोबर ग्रामपंचायतीनेही हातभार लावला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळे शाळेचे रुपडे पालटून गेले आणि शाळा केवळ सुंदरच नव्हे तर डिजिटल झाली.
शिक्षकांनी मोडकळीस आलेल्या शाळेची स्वखर्चाने केवळ दुरुस्तीची केली नाही तर शाळेची रंगरंगोटी करून भिंतीवर आकर्षक अशी चित्रेही काढली. शिक्षकांची धडपड पाहून ग्रामस्थ देखील मदतीला धावून आले तर ग्रामपंचायत आणि नोकरी निमित्त बाहेरगावी गेलेल्या भूमीपुत्रांनी देखील मदत केली. मुख्यध्यापक, शिक्षक,
ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि नोकरदार भूमीपुत्र या सर्वांचे प्रयत्न आणि एकजुटीमुळे पडक्या शाळेचे रूपांतर आज सुंदर शाळेत झाले आहे.
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील चांदोरे नावाचे सुमारे 3 हजार लोकसंख्या असलेले छोटेसे गाव असून येथे गावालगत जिल्हा परिषदेची शाळा असून त्यात गोरगरीब, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसोबत आदिवासी समाजाचे विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेतात. शाळा 49 वर्षे जुनी असल्याने ती मोडकळीस येऊन धोकादायक झाली होती. त्यामुळे ग्रामस्थ आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास घाबरत होते. अखेर शिक्षकांनी शाळेला नवे रूप देण्याचा विडा उचलून आपसात वर्गणी गोळा केली. काम जास्त तर पैसे कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शिक्षकांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचे आवाहन केले.
शिक्षक आणि ग्रामस्थांची धडपड पाहून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य देखील मदतीस सरसावले आणि त्यांनी 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत आलेला निधी शाळेला दिला. तिकडे नोकरी निमित्त बाहेर गावी गेलेल्या भूमीपुत्रांना शाळेच्या दुरुस्तीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी देखील मदतीचा हात पुढे केला. शिक्षक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत या सर्वांच्या एकजुटीमुळे एकेकाळी मोडकळीस आलेल्या शाळेचे केवळ रुपडेच पालटले नाही तर ती मोठ्या खाजगी शाळेच्या बरोबरीची डिजिटल शाळा देखील झाली. शाळेचे नवे रूप पाहून विद्यार्थी शाळेत येण्यास उत्सुक झाले असून शाळा कधी सुरू होईल याची ते आतुरतेने वाट पाहत आहे. सर्वांनी वेळेचा सदुपयोग केला तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते, हे या शाळेतील शिक्षक आणि त्यांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांनी दाखवून दिले.