किनवट तालुक्यातील गोंडजेवली इथे शनिवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या अतिवृष्टीमुळे शिवारातील माती बंधारे फुटून त्याचे पाणी शेतात शिरल्याने पन्नास एकराहून अधिक जमीन खरडून गेलीय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालंय.
या गावाला जोडणारा रस्ता देखील या पावसात वाहून गेलाय. या अतिवृष्टीची नोंद घेऊन महसूल विभागाने प्राथमिक पंचनामा केला असून सोमवारी कृषि विभाग नुकसानीची माहिती घेऊन भरपाईची कारवाई करेल असे सांगण्यात आलंय.
किनवट तालुक्यातील शिवणी या महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. तर गोंडजेवली गावावर आभाळ फाटल्यागत पाऊस बरसलाय. त्यामुळे या गावाजवळ असलेला जुना मातीचा बंधारा फुटून त्याचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे परिसरातील जवळपास पन्नास एकर क्षेत्रावरील पिके वाहून गेलीत तर जमीन खरडून गेल्याने आता दुबार पेरणी देखील शक्य नाही. त्यामुळे या गावातील पन्नास हुन अधिक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलंय.
आधीच लॉकडाऊन आणि कोरोनामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा जोरदार फटका बसलाय. शेतीच्या या नुकसानीची महसूल विभागाने नोंद घेतलीय. तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य सूर्यकांत आरंडकर यांनी पाहणी करत आढावा घेतलाय.
आरंडकर यांनी झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाला दिलीय. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृषी विभागाचे अधिकारी सोमवारी गोंडजेवली गावाला भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करणार आहेत. दरम्यान, ढगफुटी सदृश्य पावसाने गोंडजेवलीच्या ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळालय.