फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोकमधून केंद्रावर आसूड ओढलेत. देश उलथवून टाकण्याच्या कटात म्हणे हा म्हातारा सामील होता. कोणता देश? कोणाचा देश? सत्य तरी काय आहे? 84 वर्षांचा एक गलितगात्र देश उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?, असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
“अखेर फादर स्टॅन स्वामी हा 84 वर्षांचा म्हातारा पोलीस कोठडीतच मरण पावला. फाशीवर जाणाऱ्यांनाही शेवटची इच्छा विचारली जाते. फादरला तो अधिकारही मिळाला नाही. देश उलथवून टाकण्याच्या कटात म्हणे हा म्हातारा सामील होता. कोणता देश? कोणाचा देश? सत्य तरी काय आहे?”, अशा शब्दात राऊतांनी संताप व्यक्त करत केंद्रावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
“मुस्कटदाबी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी यांचे नाव प्रसिद्ध होत असताना मुंबईत फादर स्टॅन स्वामी यांचा तडफडून आणि गुदमरून मृत्यू झाला. स्वामी हे राष्ट्रीय तपास एजन्सीच्या ‘कस्टडी’त बऱ्याच काळापासून होते. त्यांचे वय 84 वर्षे. त्यांना ऐकता, बोलता येत नव्हते. दिसतही नव्हते. त्यांच्या हालचाली व श्वास पूर्ण मंदावला असताना तुरुंगातच त्यांना कोरोनाने ग्रासले. जीवनाच्या अंतिम समयी त्यांना झारखंड येथे जाऊन मित्रांसमवेत वेळ घालवायचा होता. पण स्वामी यांच्यावर दहशतवाद, फुटीरतावाद, राज्य उलथवून लावण्याच्या कटात सहभागी होण्याचा आरोप होता. 84 वर्षांचा एक गलितगात्र राजशकट उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?”, असा सवाल राऊत यांनी विचारला.
“फादर स्टॅन स्वामी हे झारखंडच्या आदिवासी भागात सामाजिक कार्य करीत होते. आदिवासी मुलांची शैक्षणिक उन्नती व्हावी, त्यांनी जागरुक व्हावे, त्यांना मानवाधिकार मिळावेत यासाठी त्यांचा संघर्ष होता. त्यांचे सारे जीवन गरीब, वंचितांना समर्पित होते. ते माओवादी विचारांचे होते की नक्षलवादी हा तपासाचा भाग. पण महाराष्ट्रातील तुरुंगातही ते कैद्यांच्या मानवाधिकारविषयी लढत होते.”
“फादर स्टॅन यांना अंतिम समयी जामिनावर सोडावे अशी विनवणी अनेकांनी केली, पण हा 84 वर्षांचा आंधळा, बहिरा, गलितगात्र म्हातारा बाहेर आला तर राज्य व्यवस्थेस सुरुंग लावील असे ‘एनआयए’ वारंवार कोर्टात सांगत राहिले व आपली न्याय व्यवस्था स्टॅन स्वामींपेक्षा जास्त गलितगात्र होऊन त्या म्हाताऱ्याच्या तिरडीची व्यवस्था करत बसली, हेच सत्य आहे”, असा घणाघात राऊत यांनी केला.
“कश्मीरातील देशद्रोही, फुटीरतावादी गुपकार गँगशी पंधरा दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी चर्चा केली. या गँगला आजही कश्मीर स्वायत्त हवेच व 370 कलम तेथे पुन्हा लागू करा अशी मागणी कायम आहे. कश्मीरातील अतिरेकी दिल्लीत चर्चेला येतात व 84 वर्षांचे फादर स्टॅन स्वामी तुरुंगात तडफडून मरतात. देशाचे एकही न्यायालय स्टॅन स्वामी यांची साध्या जामिनावर सुटका करू शकले नाही. वृत्तपत्रांची मुस्कटदाबी होत आहे तशी न्याय व्यवस्थेचीही मुस्कटदाबी सुरू झाली आहे काय?”, असा सवालही राऊतांनी विचारला.