महापालिका निवडणुकीचे वारे सध्या राज्यात वाहत आहे. मुंबई, पुण्यासाठी राज्यातील महत्वाच्या महापालिका निवडणुका चालू वर्षात होण्याचीच शक्यता आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंही जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. तर भाजपही आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवताना दिसून येत आहे.
अशावेळी देशाची राजधानी दिल्ली आणि पंजाबमध्ये आपला झेंडा गाडल्यानंतर आता आम आदमी पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे. ‘येऊ का झाडू मारायला?’ असा प्रश्न विचारत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपने महापालिकेतील भ्रष्ट कारभारावर बोट ठेवल्याचं पाहायला मिळतं आहे.
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपला असला तरी अद्याप निवडणूक जाहीर झालेली नाही. अशावेळी आम आदमी पक्षाने उमेदवार निवडीला सुरुवात केलीय. तसंच सोशल मीडियातून प्रचारही सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. दिल्लीत केलेल्या विकासाचा मुद्दा घेऊन आप मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
महापालिकेच्या सर्व 236 जागा लढवण्याचा आपचा विचार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली असल्याची माहितीही आपचे मुंबई सचिव संदीप मेहता यांनी माध्यमांना दिलीय. तर ‘दिल्ली बदली अब मुंबई की बारी…’ असा नारा आपने दिलाय.
स्वच्छ चारित्र्य आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नसलेले उमेदवार देण्यावर आपचा भर असतो. त्यामुळे चांगलं शिक्षण झालेला आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला उमेदवार आम्ही देणार असल्याची माहिती आपच्या नेत्यांनी दिलीय. आपने उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासही सुरुवात केलीय. आप मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्व ताकदीने उतरणार आहे. आमच्या किमान 36 जागा निवडून येतील, असा विश्वासही आप नेत्यांनी व्यक्त केलाय.