नागपूरच्या अंबाझरी तलावात झेंडा घेऊन पोहत जाणारे हे देशभक्त नागपूरचे आहेत. दरवर्षी 26 जानेवारीला हे या तलावाच्या मधोमध पोहत जातात. त्या ठिकाणी झेंडा फडकावितात. पाण्यातच राहून राष्ट्रगीत गातात. देशाप्रती प्रेम आणि अनोखं झेंडावंदन बघण्यासाठी या ठिकाणी लोकसुद्धा मोठ्या उत्साहाने येतात. जवळपास पाचशे मीटरचे अंतर हे लोक पोहून जातात. पाण्यावर उंच ठिकाणी झेंडा फडकवतात. ही परंपरा गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू आहे. दरवर्षी यात नवनवीन लोकं जुळतात. ही सर्व मंडळी वर्षभर या तलावात पोहतात. 26 जानेवारी आणि 15 आॕगस्टला या ठिकाणी झेंडावंदन करतात, अशी माहिती स्वीमर दिव्यांग मुलगी तसेच आयोजकांनी दिली.
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 500 फूट लांब तिरंगा बनविला. रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रामनगर चौकातून ही रॅली निघाली. फुटाळा तलावापर्यंत काढण्यात आली. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांसोबतच मोठ्या संख्येने युवा मोर्चाचे कार्यकर्तासुद्धा सहभागी झाले होते. हा विशाल असा तिरंगा बघण्यासाठी लोकांनी सुद्धा गर्दी केली. हा तिरंगा युवकांच्या खांद्यांवर लहरत असताना देशभक्तीसुद्धा दिसत होती. प्रत्येक जण या तिरंग्याकडं पाहत होता.
नागपूर महानगरसंघचालक राजेश लोहिया यांनीसुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वीकारलेल्या गणतंत्रानुसार आतापर्यंत आपण चाललो की नाही, पुढे किती चालायला हवं. याचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे, असं ते म्हणाले. स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलं. कोण-कोण क्रांतीवीर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते, त्याची आठवण करण्याचा आजचा दिवस असल्याची आठवण त्यांनी करून दिली. जसं आपण आपल्या जन्मदिनी संकल्प करतो, तसा संकल्प आज करावा.
देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा संकल्प करावा. हेडगेवार आणि सुभाषचंद्र बोस यांच्या भेटीवर राजेश लोहिया म्हणाले, संघाचे स्वयंसेवक, अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतीवीरांशी संपर्क आला. संघ स्वयंसेवकांनी त्यांना मदत केली. फक्त संघ स्वयंसेवकच नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनीही क्रांतीवीरांना मदत केली. भेटीबाबत जे वास्तव आहे ते आहे. ज्या बातम्या चालतात त्यावर आज चर्चा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.