भुसावळ खाद्यभ्रमंती : 3.
तिसरा लेख आहे..आवडला किंवा नाही हे जरुर कळवा.. काल आपण गांधी चौकापर्यंत आलो होतो, त्या चौकाच्या डाव्या हाताला वळल कि सराफ बाजार..
सु. य. सराफ , अग्रवाल, विसपुते, नवगाळे अश्या ब-याच नामवंत सराफाच्या पिढ्यानपिढ्या असलेल्या पेढ्या ( काही नांव राहिली असल्यास क्षमस्व ) तिथेच मग शहरातला ब-यापैकी मोठा असलेला चौक, मशिद आणि राममंदीर एकाच ठिकाणी असा तो मजेशीर चौक. .मशिदिच्या इमारतीचच खाली अग्रवाल बंधुंची चाटची दुकाने, तिथे पाणीपुरी चांगली मिळायची अजुनही मिळते..जोडीला कचोरी, समोसे व इतर मिठाया. समोरच प्रभात लस्सीचे जुने दुकान, उन्हाळा आणि भुसावळातील लग्नाचे बस्ते यांच ह्या लस्सीबरोबर अतूट नात.. लग्नाचा बस्ता हा बांधला जातो पण भुसावळात तो फाडला जातो.. तिथले उन्हाळ्यातल्या तापमानाची सुरुवातच, साधारण 48 डिग्री पासुन.. त्यावर ही लस्सी हा अप्रतिम उपाय..चौकाच्या जवळपासच चांडक..आनंद एम्पोरियम वगैरे साड्यांची ,कपडालत्याची दुकान, बस्त्याला आलेल्या मंडळींना याच लस्सीची सवय , बस्ता झाला कि समस्त मंडळींची पावले या लस्सीकडे वळायची. वराकडची ,वधुकडची, त्यांचे नातेवाईक मित्र, असा सगळा गोतावळा असायचा..बस्ता बांधतांना झालेले रुसवेफुगवे यात लस्सीच्या ग्लासात विरघळुन जायचे..त्यात एखादी सुबक ठेंगणी ( पु.लं.च्या भाषेत ) एखाद्या भावड्याला आवडलेली असायची, त्याची तिच्याकडे बघण्याची धडपड, नियोजित वधू वरांची आपआपसात नेत्रपल्लवी चाललेली, सफारीच्या रंगावरुन किंवा सफारीच कापडाचं जमल नाही म्हणुन रुसलेला जावई, त्याची समजुत काढा म्हणुन वधुपित्याची एखाद्याला चाललेली विनवणी.. यावर त्याच उत्तर.. भिकाभाऊ त्ये माह्यावर सोडा मी पाही घीन त्याले ! बिल देतांना सुबक ठेंगडीवर इंप्रेशन मारायचे म्हणुन आपला भावड्या मोठ्याने आवाज द्यायचा ” शेठ बिल कोन्हीबी दिल, त त्ये घ्याच नी.. ते माह्याकडे लागल.. यावर वधुपित्याने हुश्य करुन सोडलेला निश्वास थेट गल्ल्यापर्यंत एेकु जायचा..हे सगळ जुळुन यायच ते प्रभातच्या लस्सीमुळे..याच चौकातले दामु चे बटाटेवडे अतिशय प्रसिध्द..त्याच दुकान पहाटे पाचलाच उघडायच.. पहाटेची पहिली नमाज आटोपुन मुस्लिमसमाज या दुकानात वडे आणि जिलेबीवर ( भुसावळकर : जिलंबी ) ताव मारायचे..त्यावेळेस वड्यासोबत पाव वगैरे भानगड नसायची.संध्याकाळी तिथे एक पाणीपुरीची गाडी लागायची. गाडीमालकाच नाव होत गुलाब, त्याच नावाने ती प्रसिध्द होती एका रुपयात सहा पु-या तेही गरम रगडा, शेव व कांद्यासहित..आता विश्वास बसत नाही, पण मिळायच्या खर..त्याच्याकडचा खस्ता आणि स्पेशल भेळ तर अफाट चवीची , गरम समोसा किंवा कचोरी चुरुन त्यात फरसाण शेव मुरमुरे चिंचगुळ घातलेली चटणी वर पुदिन्याची चटणी, आत्मा थंडगार व्हायचा..या सगळ्याचा जर एखादेवेळी कंटाळा आला तसा तो यायचाच नाही पण अपवाद म्हणुन कधीतरी गणेश हाँटेलची झणझणीत मिसळ. सोबत फक्त पापड व कांदा आणि दही, पावाचे चोचले नसायचे. झालच तर ,सकाळच्या नाश्त्यासाठी जवळच्याच बांगडीबाजारात एक सिंधी होता अजुनही असेल बहुदा..तो त्यांचा टिपीकल नाश्ता , म्हणजे दाल पकवान द्यायचा. चणा आणि मुग यांची भन्नाट मिक्स दाळ वर लसणाची ओली चटणी व पुदिन्याचा शिडकाव सोबतीला एक खस्ता, हा टिपीकल सिंधी नाश्ता खाण्यासाठी झुंबड असायची. वर्षाचा पहिला सण गुढिपाडवा, त्यासाठी जवाहर डेअरीचा चक्का आणुन त्याच श्रीखंड करणे हा एक ठरलेला सोहळा, आता सहसा हा उपद्व्याप कोणी करत नाही कारण चितळे किंवा तत्सम मंडळीचे आम्रखंड किंवा श्रीखंड आणतात,खुद्द जवाहर डेअरीत देखील त्यांच्याच ब्रँडचे श्रीखंड मिळते, तिथली लस्सी व आईसक्रिम हे सुध्दा प्रसिध्द…आता इथेच थांबतो कारण जास्त लांबलेल लिखाण आणि हमखास येणारी जांभई यांच एक अतुट नांत आहे.तस व्हायला नको.. भेटुयात पुढच्या भागात..
©सारंग जाधव.