‘ॐ नमस्ते गणपतये…’ 2 वर्षानंतर दगडूशेठ हलवाई मंदिरात उमटले सूर, 31 हजार महिलांची उपस्थिती

लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन झालं आहे. दोन वर्षांनंतर होत असलेल्या गणेशोत्सवामुळे संपूर्ण राज्यात गणेशभक्तांचा महापूर आला आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मध्ये ‘ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि..’ असे 31 हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते.

कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्ष गणेशोत्सव साजरा करता आला नाही. पण, यंदा कोरोनाची लाट ओसरल्यामुळे दणक्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे 31 हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यावेळी उपस्थित होते.

पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपामध्ये गर्दी केली होती.उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा 35 वे वर्ष होते. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले. आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.