देशात डिजीटल व्यवहार झपाटय़ाने वाढत असल्याने सायबर गुन्हेगारीही वेगाने वाढत आहे. सायबर गुन्हेगारांची महाराष्ट्रावर करडी नजर आहे. देशात उत्तर प्रदेश आणि कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सायबर गुन्हेगारीमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या तर कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. ऑनलाइन फसवणुकीपासून, बदनामीकारक मजकूर ते लैंगिक छळापर्यंतच्या गुन्ह्यांचा समावेश सायबर गुन्ह्यांमध्ये होतो. सर्वाधिक गुन्हे आर्थिक फसवणुकीचे असून त्यामध्ये एटीएम, क्रेडिट कार्ड, ग्राहक प्रतिनिधी सांगून, क्युआर कोड स्कॅन करण्यास सांगून, बँकेतून बोलत असल्याचे सांगून किंवा लॉटरी, बक्षीस लागल्याचे सांगून जाळे टाकत
असतात. त्यासाठी शेकडो सीमकार्ड आणि बनावट नावाने बँक खाते काढून ऑनलाईन पैसे वळते करून फसवणूक करीत असतात. यासोबतच महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारांकडून लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये वेगवेगळय़ा अॅपच्या माध्यमातून, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप किंवा बेवसाईटवरून मैत्री करून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून खंडणी उकळली जाते. या अहवालानुसार, ५ हजार ४९६ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून कोटय़वधी रुपयांनी राज्यातील जनतेला लुबाडण्यात आले आहे.
राज्यात सर्वाधिक लुबाडणूक झालेल्यांची संख्या मुंबईनंतर नागपुरात आहे. गतवर्षी मुंबईत सायबर गुन्हेगारीचे २ हजार ४३३ गुन्हे दाखल झाले असून दुसऱ्या क्रमांकावर नागपूर आहे. गेल्या पाच वर्षांत सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्याचे ७९३ गुन्हे दाखल झाले असून २२९ गुन्ह्यांचा उलगडा नागपूर पोलिसांनी केला आहे. यामध्ये १५९ आरोपींविरुद्ध न्यायालयात खटले भरण्यात आले आहेत. २०२० मध्ये सर्वाधिक २४३ गुन्हे दाखल करण्यात आले. यातील ५३ गुन्ह्यांचा उलगडा पोलिसांनी केला असून ३५ आरोपींना अटक केली आहे.