दिल्ली आणि राजधानी परिसरात जवळच्या संपर्कातील लोकांमुळे करोना संसगार्चा दर गेल्या १५ दिवसांत ५०० टक्क्यांनी वाढल्याचा दावा एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या लोकांनीच हा दावा केल्याचे संस्थेने म्हटले आहे.
करोना संसर्ग झालेल्या आपल्या जवळच्या संपर्कातील एक किंवा त्याहून अधिक व्यक्ती आहेत, असे या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे १९ टक्के रहिवाशांनी सांगितले. दिल्लीत करोना रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करण्यात आले. दिल्लीत शनिवारी ४६१ रुग्णांची नोंद झाली होती. चाचणी केलेल्यांपैकी ५.३३ टक्के लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले होते.
राष्ट्रीय राजधानी परिसरात करोनाचा प्रादुर्भाव गेल्या १५ दिवसांत ५० टक्क्यांहून अधिक वाढला आहे, असे सर्वेक्षण करणाऱ्या ‘लोकल सर्कल’ या संस्थेने सांगितले. हे सर्वेक्षण दिल्ली आणि राजधानी परिसरातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात आले आणि त्याला ११,७४३ रहिवाशांनी प्रतिसाद दिला. त्यात ६७ टक्के पुरुष, तर ३३ टक्के महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, दिल्लीतील करोना संसर्गदर पुन्हा पाच टक्क्यांहून अधिक झाल्याने करोनासदृश्य लक्षणे दिसणाऱ्यांनी चाचणी करून घ्यावी आणि आरोग्य प्रशासनाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुखपट्टी बंधनकारक करावी, अशा सूचना रविवारी तज्ज्ञांनी केल्या. दिल्लीतील संसर्गदर गेल्या १५ दिवसांत अर्ध्या टक्क्यावरून ५.३३ टक्क्यांवर गेल्याने तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए) २० एप्रिल रोजी परिस्थितीचा आढावा घेणार असून दैनंदिन रुग्णवाढ आणि संसर्गदरातील मोठी वाढ लक्षात घेऊन ही बैठक आधीच होणे आवश्यक होते, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.