तुमच्या राज्यात मला जगायची
इच्छा राहिलेली नाही : अण्णा हजारे
मी सरकारला निरोप पाठवला. मग त्यांची लोकं चर्चेसाठी आलीत. मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की तुमचं मी सगळं ऐकलंय, आता तुम्ही सरकारला माझा एक निरोप पाठवा की तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिलेली नाही. एक्साईज विभागाचे आयुक्त मला भेटायला आले. पण मला त्यांच्यावर विश्वास नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाइन आमची संस्कृती नाही. तुम्ही त्याची खुल्याने विक्री करताय, ते पाहून मला या सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही,” असं अण्णा हजारे म्हणाले.
गुजरातमध्ये २८ बँकांना तब्बल
२२,८४२ कोटींचा चुना
मोठ्या एका घोटाळ्याचा भांडाफोड गुजरातमध्ये झाला आहे. एकूण २८ बँकांना तब्बल २२,८४२ कोटींचा चुना लावणाऱ्या एबीजी शिपयार्ड या कंपनीविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी दिवसभर या कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयकडून छापेमारी सुरू होती. हा आत्तापर्यंत उघड झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक मानला जात आहे. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयनं एबीजी शिपयार्ड (ABG Shipyard) विरोधात आणि कंपनीच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. २८ बँकांची तब्बल २२ हजार ८४१ कोटींना फसवणूक केल्याचा आरोप या कंपनीवर आहे.
MBBS चा अभ्यासक्रम हिंदीत
मध्यप्रदेशात समिती स्थापन
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमात शिकवण्याची तयारी सुरू आहे. भोपाळच्या शासकीय गांधी वैद्यकीय महाविद्यालयातून राज्यात याची सुरुवात केली जाणार आहे. हिंदी माध्यमातून एमबीबीएसचे शिक्षण देणारं मध्य प्रदेश हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. MBBS चा अभ्यासक्रम हिंदीत करण्याचा कृती आराखडा तयार करण्यासाठी आणि त्याचा अहवाल देण्यासाठी मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. जितेन शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती सारंग यांनी दिली.
राज्यात निर्बंध हटवले
जाण्याची शक्यता
राज्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या डोसचं लसीकरण करून घ्याव असं आवाहन देखील टोपे यांनी केलंय. निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली. राज्यातील करोना संख्येत बरीच घट झाली आहे, तसेच दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होत आहे, येत्या काळात निर्बंध हटवले जाण्याची शक्यता आहे.
मी माझ्या भावासाठी माझा
जीव देऊ शकते : प्रियंका गांधी
मी माझ्या भावासाठी माझा जीव देऊ शकते आणि तो माझ्यासाठी जीव देऊ शकतो,” असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज म्हटलं. भाऊ-बहिणींमध्ये संघर्ष असल्याच्या भाजपाच्या आरोपाला उत्तर देताना प्रियंका गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात मतभेद सुरू असल्याचं म्हटलं होतं, त्यावर उत्तर देत “आमच्यात मतभेद कुठे आहे”, असा सवाल त्यांनी केला आहे. यावरून प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला.
पेक्स्लोव्हिड औषधास चीनच्या
औषधे नियामकांची सशर्त मंजुरी
फायझरने कोविड-१९ वरील उपचारासाठी तयार केलेल्या पेक्स्लोव्हिड या औषधास चीनच्या औषधे नियामकांनी सशर्त मंजुरी दिली आहे. पेक्स्लोव्हिड ही करोनावरील तोंडावाटे घ्यायची पहिलीच गोळी आहे. चीनच्या राष्ट्रीय वैद्यकीय उत्पादने प्रशासनाने म्हटले आहे की, ज्या प्रौढ रुग्णांना सौम्य ते मध्यम स्वरूपाची करोनाबाधा झाली आहे आणि ती गंभीर होण्याची मोठी जोखीम आहे, त्यांना पेक्स्लोव्हिड हे औषध देण्यास आम्ही मंजुरी दिली आहे. औषधावर अभ्यास होण्याची तसेच त्याबाबतचा अहवाल मिळण्याची गरज आहे.
गुजरातमध्ये दोन हजार कोटींचा
अंमली पदार्थांचा साठा जप्त
भारतीय नौदलाला मोठे यश मिळाले आहे. गुजरातमध्ये भारतीय नौदलाने पाकिस्तानातून सागरी मार्गाने भारतात आणल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत जवळपास दोन हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या वर्षात जप्त करण्यात आलेला ड्रग्सचा हा सर्वात मोठा साठा आहे. गुप्तचर यंत्रणांकडून भारतीय नौदलाला माहिती मिळाली होती. यानंतर भारतीय नौदलाने कारवाई करत आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळून ड्रग्जचा साठा पकडला
पुणे महाापालिकेच्या आवारात
किरीट सोमय्या यांचा सत्कार
पुणे महापालिकेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर मागील आठवड्यात शिवसैनिकांकडून हल्ला झाल्यानंतर, काल त्याच जागेवर भाजपाकडून सोमय्या यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पुणे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात या जंगी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यासाठी महापालिकेच्या आवारात मोठ्यासंख्येने भाजपा नेते, कार्यकर्ते जमले होते. दरम्यान, यावेळी मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी देखील केली गेली. पोलिसांनी या सत्काराच्या कार्यक्रमास विरोध दर्शवला होता मात्र तरी देखील भाजपा कार्यकर्ते महाापालिकेच्या आवारात शिरले आणि त्यांनी सोमय्या यांचा सत्कार केला.
कोरोनामुळे 5 जणांचा
नाशिक जिल्ह्यात मृत्यू
नाशिकमध्ये एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. दुसरीकडे ओमिक्रॉन विषाणूचे बहुतांश रुग्ण असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत नाहीय. मात्र, गंभीर रुग्णांचे मृत्यू होत असल्याने पुन्हा एकदा शंकेची पाल चुकचुकलीय. नाशिक जिल्ह्यात 11 फेब्रुवारी रोजी कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नाशिक महापालिका हद्दीतील 3, नाशिक ग्रामीणमधील 2 रुग्ण आहे.
पराक्रमी शहाजीराजे यांच्या
समाधीची दुरवस्था
‘शिवरायांसारख्या महापुरुषाला आणि ‘महाराष्ट्र’या कल्पनेला जन्म देणारे पराक्रमी शहाजीराजे कर्नाटकाच्या मातीत (कशाबशा 20 गुंठे जमिनीवरच्या उघड्या माळरानावर ) एकाकी स्थितीत चिरनिद्रा घेत आहेत. त्या वीर पित्याच्या समाधीवर साधे गंजक्या पत्र्याचे सुद्धा छप्पर नाही. ती दुरवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आणि पोटात गोळा उठेल,’ अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहून व्यक्त केली आहे.
सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत
प्रचार करता येणार
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शनिवारी राजकीय पक्षांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता सर्व राजकीय पक्ष घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करुन सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत प्रचार करु शकणार आहेत. निवडणूक आयोगाने आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या दिशा निर्देशानुसार निवडणूक होत असलेल्या राज्यांमध्ये पायी रॅलीला परवानगी दिली आहे.
7 नोव्हेंबर हा राष्ट्रीय विद्यार्थी दिन
म्हणून साजरा करावा : राष्ट्रपती
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी 7 नोव्हेंबर हा राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा, अशी सूचना महामहीम राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज रत्नागिरीमध्ये केली. मंडणगड तालुक्यातील डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे राष्ट्रपती कोविंद यांनी सपत्नीक भेट देऊन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर कार्यक्रमात ते बोलत होते.
SD social media
9850 60 35 90