बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता होती. १४ एप्रिल रोजी दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. अजूनही त्यांच्या लग्नाच्या चर्चा या सुरुच आहेत. या सगळ्यात चर्चा ही रणबीरला आलियाच्या आईने दिलेल्या अनमोल भेटची होती. तर आलियाच्या बहिणींनी रणबीरकडे बूट चोरण्यासाठी ११. ५ कोटींची मागणी केली. मात्र, रणबीरने त्यांना केवळ १ लाख रुपये दिले.
रणबीर आणि आलियाच्या लग्नात मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीरने त्यांच्या अंगठ्या बदलल्या आणि आलियाला भेट म्हणून हिऱ्याची अंगठी मिळाली. आलियाची आई सोनी राझदानने रणबीरला २.५ कोटींची घड्याळ भेट दिली. तर नातेवाईकांनी आलिया आणि रणबीरला भेटवस्तूही दिल्या. भट्ट कुटूंबाने लग्नात हजेरी लावलेल्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून कश्मीरी शॉल भेट दिली. या सगळ्या शॉल आलियाने स्वत: पसंत केल्या होत्या. ही शॉल फाइन मटेरिअलपासून बनलेली असून महाग आहे.
दरम्यान, असे म्हटले जाते की, आलियाने पंजाबी लग्ना परंपरेनुसार हळदीच्या कार्यक्रमानंतर चुडाचा कार्यक्रम केला नाही. कारण यानंतर हातात असलेला चुडा हा वधूला ४० दिवस ठेवावा लागतो. तर आलियाला लग्नाच्या काही दिवसानंतरच तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करायचे आहे. या व्यतिरिक्त तिचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट असणार आहे.