आज दि.२५ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात
SARS CoV 2चा डेल्टा व्हेरीएंट सापडला

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात SARS CoV 2 च्या डेल्टा प्रकारांची सबलाइनर प्रकरणे आढळून आल्यानंतर भारताचा करोना जीनोमिक सर्व्हिलन्स प्रोजेक्ट हाय अलर्टवर आहे. नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल कडून जारी करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग अहवालात इंदूरमध्ये नवीन कोविड प्रकारच्या AY.4 – डेल्टा व्हेरियंटची सात प्रकरणे आढळून आली आहेत. त्यापैकी दोन महू कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेले लष्करी अधिकारी आहेत, असे इंदूरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ बीएस सैत्य यांनी सांगितले आहे. सप्टेंबरमध्ये यांचे नमुने घेण्यात आले होते.

एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ; २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून होणार लागू

  • साध्या बसचा रात्रीचा प्रवास झाला स्वस्त
  • इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून ती किमान ५ रूपयाने वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रूपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.

समीर वानखेडे यांची
खात्यांअंतर्गत चौकशी होणार

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची खात्यांअंतर्गत चौकशी होणार आहे. पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर समीर वानखेडे आणि प्रभाकर साईल यांची अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. प्रभाकर साईन यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर एनसीबीच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. विविध राजकीय नेत्यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती त्यानंतर आता समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे.

भारतीय परंपरेतील धर्मनिरपेक्ष
कुटुंबातील मी सदस्य समीर वानखेडे

नवाब मलिक यांच्या टीकेला उत्तर देताना वानखेडे यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. याच संदर्भात मी सांगू इच्छितो की माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे,” असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना
दादासाहेब फाळके पुरस्कार

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा आज पार पडला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उपस्थित व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ने गौरवण्यात आले. त्यासोबतच अभिनेत्री कंगना रनौतला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर हिंदी चित्रपट विभागात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला.

मराठी भाषिकांवर होणाऱ्या
अन्यायविरोधात बेळगावात मोर्चा

कर्नाटक शासनाकडून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केल्याने खडाजंगी उडाली. कर्नाटक शासन मराठी भाषिकांना सापत्नपणाची वागणूक देत असल्याचा भाषिकांचा आरोप आहे. बेळगाव महापालिकेसमोर लावलेला अनधिकृत लाल-पिवळा झेंडा हटवण्यात यावा, मराठी भाषेतून शासन आदेश प्रसिद्ध व्हावेत, आदी मागण्यांसाठी मोर्चाला सुरुवात झाली.

धोनीचा पाकिस्तानी क्रिकेटर्स
सोबतचा फोटो झाला व्हायरल

ICC T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावत असलेल्या महेंद्रसिंह धोनीने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. सामना संपल्यानंतर धोनीचा पाकिस्तानी क्रिकेटर्स सोबतचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. धोनीसमोर पाकिस्तानचे चार खेळाडू कर्णधार बाबर आझम, इमाद वसीम, शोएब मलिक आणि युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहनी उभे असल्याचे दिसले. धोनी त्यांच्यासोबत आपले अनुभव शेअर करतांना दिसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आयसीसीने देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे.

अडकित्याने सुपारी समजून
फोडला गावठी बॉम्ब

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे एक भयंकर घटना घडली आहे. सावंतवाडी येथील एका महिलेनं सुपारी समजून अडकित्याने चक्क गावठी बॉम्ब फोडला आहे. गावठी बॉम्ब अडकित्याने फोडल्यामुळे संबंधित महिलेची भंयकर अवस्था झाली आहे. या घटनेच ६० वर्षीय महिलेचं एक बोट पूर्णपणे तुटले असून हाताला देखील मोठी दुखापत झाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.

पीडित महिलांना आधार देणारी
‘मनोधैर्य’ योजनाच झाली निराधार

बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झालेल्या महिला-मुलींना आधार देण्यासाठी राबविण्यात येणारी ‘मनोधैर्य’ योजनाच निराधार झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ होत असताना पीडित महिलांना अर्थसाहाय्य मिळणे तांत्रिक अडचणी आणि शासकीय उदासीनतेमुळे दुरापास्त झाले आहे. योजनेतील तरतुदींनुसार पूर्वी बलात्कारित महिलांना अर्थसाहाय्य देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. ते डिसेंबर २०१७ पासून जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणास देण्यात आले.

पाकिस्तानचे गृहमंत्री म्हणतात,
भारताला ताकद दाखवली

पाकिस्तानी गृहमंत्री रशीद यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणातात, “मी पाकिस्तानी जनतेला विजयाबद्दल शुभेच्छा देतो. ज्याप्रकारे संघाने विजय मिळवला आहे, त्याला मी सलाम करतो. आज पाकिस्तानने आपली ताकद दाखवली आहे. मला वाईट याचं वाटतं की हा पहिला भारत-पाकिस्तान सामना आहे, जो मी जनतेच्या काही जबाबदाऱ्यांमुळे प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहू नाही शकलो. परंतु मी यंत्रणेला सांगितले आहे की जनतेला जल्लोष साजरा करू द्या. पाकिस्तानी संघाला व जनतेला शुभेच्छा. आजच आपली फाइनल होती. जगभरासह भारतातील मुस्लिमांच्या भावना पाकिस्तानी संघासोबत होत्या. इस्लामला विजयाबद्दल शुभेच्छा.”

रिक्षा चालकाला भरावे लागणार 3 कोटी रुपये, INCOME TAX ने पाठवली नोटीस

आयकर विभागानं एका सायकल रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीला तब्बल 3 कोटी रुपये भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. हे नोटीस पाहून रिक्षाचालकाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. हातावरचं पोट असणाऱ्या गरीब रिक्षाचालकाच्या हातात आयकर विभागानं नोटीस दिली आणि लवकरात लवकर 3 कोटी भरण्याचे आदेश दिले.प्रताप सिंह हे उत्तर प्रदेशच्या मथुरेत सायकल रिक्षा चालवण्याचं काम करतात. त्यांना आयकर विभागाकडून 3 कोटी रुपये इन्कम टॅक्स भरण्याची नोटीस आली. यामुळे धक्का बसलेले प्रताप सिंह हे थेट पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला नसला तरी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मागासवर्गीय असल्यानेच
वानखेडे टार्गेट : आठवले

क्रुझवर झालेल्या छापेमारीनंतर सत्ताधाऱ्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना घेरले आहे. सत्ताधाऱ्यांकडून वानखेडेंची पोलखोल केली जात असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. समीर वानखेडे यांना संरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे. राज्यपालांना भेटून त्याबाबतची मागणी करण्यात येणार आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जातंय, असा आरोपही आठवले यांनी केला.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.