राज्यात पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, राज्यातील 16 जिल्ह्यांसह मुंबई-पुण्यात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पाणीप्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
आज-उद्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पाणीसाठ्याबाबत चिंता कायम आहे.
ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतेक भागात पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील एकूण 16 जिल्ह्यांसह मुंबई आणि पुणे शहरांतही हंगामातील पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी पडला. त्यामुळे पाणीसाठ्याबाबत अद्यापही चिंता कायम असून, आठवड्यापासून पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. राज्यातील सर्व धरणांत मिळून गेल्यावर्षीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. दरम्यान, अनेक भागांत पाऊस हजेरी लावणार असल्याने काही ठिकाणी तरी हंगामातील पावसाची सरासरी पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पुढील दोन दिवस मोठ्या पावसाची शक्यता आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदूरबार, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भातील अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांत काही भागांत या दोन दिवसांत मुसळधारांची शक्यता आहे.