आज दि.१ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

भूकंप येऊ दे की आणखी काही, राम मंदिराच्या छताला काहीच होणार नाही

देश-विदेशातील करोडो रामभक्त अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आतुर आहेत. भाविकांच्या भावना लक्षात घेऊन श्री राम मंदिर उभारणीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीने मंदिराचं तसूभरही नुकसान होऊ नये, असं भक्कम बांधकाम केलं जातंय. याचाच एक भाग म्हणून मंदिराच्या छतावरील प्रत्येक दगडाला तांब्याच्या पट्टीने दुसऱ्या दगडाशी जोडलं जात आहे. वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे हे बांधकाम सुरू आहे.श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी याबद्दल सांगितलं की, ‘राम मंदिराच्या छतावरील दोन दगडांना जोडण्यासाठी तांब्याचा वापर केला जातोय. तांब्याचं वय अनंत असतं.100 वर्षात लोखंड गंजून खराब होतं पण तांबे 1000 वर्षे जसच्या तसं राहतं. त्यामुळे येथे तांब्याचा वापर करण्यात आला आहे. जेणे करून भूकंप झाला तरी एकही दगड आपल्या जागेवरून हलणार नाही.

उद्या दहावीचा निकाल

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. मात्र आता स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल नक्की कधी लागणार याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उद्या म्हणजेच 02 जून रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (maharashtra ssc result 2023) होणार आहे असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या, सिंधी समाजाबद्दलच्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. सिंधी समाजाबद्दलच्या वक्तव्याविरोधात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी समाजाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्याची तक्रार भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वामी यांनी दिली होती, त्यानंतर उल्हासनगर हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 मे रोजी उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरात राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

सापत्न वागणुकीवरून गजानन कीर्तिकरांचं घुमजाव

भाजप प्रणित एनडीएमध्ये सापत्न वागणूक मिळत असल्याची टीका शिवसेना खासादार गजानन कीर्तिकरांनी केल्यामुळे युतीत सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता कीर्तिकरांनी त्या वक्तव्यावर घुमजाव केलाय. आपण असं कोणतही वक्तव्य केलं नसल्याची सारवासरव कीर्तिकरांनी केली आहे.भाजपकडून केंद्रात सापत्न वागणूक मिळत असल्याची टीका गेल्या आठवड्यात कीर्तिकरांनी केली होती. केंद्रातील भाजप प्रणित एनडीएत शिंदेंच्या शिवसेनेचा समावेश आहे. मात्र केंद्रात भाजपकडून घटक पक्षांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप गजानन कीर्तिकरांनी केला होता.

जळगाव :भरदिवसा दरोडेखोर घुसले SBI बँकेत, मॅनेजरवर केला वार, पैशांच्या बॅगा भरून लंपास

जळगाव शहरातील कालिंका माता चौक परिसरात असलेल्या स्टेट बँकेवर भर दिवसा दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 2 दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून आणि बँक व्यवस्थापकावर धारदार शस्त्राने वार करून सुमारे 15 लाखांची रोकड लंपास केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कालिंका माता चौक परिसरात असलेल्या स्टेट बँक शाखेत ही घटना घडली. दोन शस्त्रधारी दरोडेखोरांनी प्रवेश करत बँक व्यवस्थापकावर धारदार शस्त्राने वार केला.त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांवर दमदाटी करून बाजूला सारण्यात आले.  बँक व्यवस्थापक राहुल महाजन यांनी विरोध केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहे. दरोडेखोरांनी लॉकरमध्ये ठेवलेली सुमारे 15 लाख रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडाला छावणीचे स्वरूप

किल्ले रायगडावर १ जून ते ७ जून या कालावधीत ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. या कालावधीत गडावर लाखो शिवभक्त आणि पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे हीबाब लक्षात घेऊन रायगड किल्ला परिसरात तब्बल २ हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सात दिवस चोविस तास हा बंदोबस्त तैनात असणार आहे. त्यामुळे किल्ले रायगडाला सध्या छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.राज्यसरकारच्या वतीने यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य स्वरुपात साजरा केला जाणार आहे. १ जून ते ७ जून या कालावधीत गडावर विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजसदरेवर भव्य राजवाड्याच्या धर्तीवर मंडप उभारण्यात आला आहे. या दिवसात लाखो शिवभक्त गडावर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडावरील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यमंत्री मंडळातील अनेक मंत्री आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सोहळ्याला २ जूनला हजेरी लावणार आहेत

शिवरायांना मानाचा मुजरा

किल्ले रायगडनंतर नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्यानिमित्त 3500 दिव्यांचा दीपोत्सव संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहे.6 जुन 1674 रोजी किल्ले रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापन करून शिवाजी महाराज छत्रपती झाले.किल्ले रायगड नंतर हा नेत्रदीपक सोहळा  नागपुरात साजरा केला जातो.शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न केला जातो.स्वराज्यासाठी कामी आलेल्या अनेक ज्ञात-अज्ञात मावळ्यांना दीपोत्सवाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.नागपूरातील महाल भागात असलेल्या शिवतीर्थ येथे हा दीपोत्सव संपन्न झाला. या प्रसंगी भव्य अशी किल्ले रायगडची हुबेहुब प्रतिकृत्ती तयार करण्यात आली आहे.

पुढचे 2 दिवस Heat Wave ! घराबाहेर पडू नका, हवामान विभागाकडून मोठी अपडेट

एकीकडे हवामान विभागाकडून मान्सून वेळेत असल्याचे संकेत देण्यात आले असताना आता हवामान विभागाकडूनच मोठी अपडेट आली आहे. विकेण्डआधी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. त्यामुळे तुम्ही घराबाहेर कामाशिवाय पडू नका.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात दोन ठिकाणी हिटवेवचा अलर्ट देण्यात आला आहे.मध्य महाराष्ट्र विदर्भ, छत्तीसगड इथे पुढचे दोन दिवस हिटवेवचा अलर्ट देण्यात आला आहे. 2 आणि 3 जूनला लोकांनी विशेष काळजी घ्यावी असं यामध्ये म्हटलं आहे.हवामान विभागाने घराबाहेर पडणाऱ्या लोकांसाठी गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. कॉटन कपडे, होममेड ड्रिंक्स, घेणं आवश्यक आहे. ज्यामुळे डिहाड्रेशन होणार नाही.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला आहे

कर्नाटकचे सूत्र काँग्रेस राज्यातही राबविणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मुद्दे आणि तेथील समाजिक अभिसरणाचा (सोशल इंजिनिअरिंग) प्रयोग महाराष्ट्रात राबविण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीची पावले पडताना दिसू लागली आहेत. ‘४० टक्के कमीशन’ या मुद्द्यावरून काँग्रेसने कर्नाटकातील भाजपला जेरीला आणले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही यावर टोकदार भाष्य केले होते. हाच मुद्दा आता महाराष्ट्रात मांडला जात असून कोल्हापुरात त्याची सुरुवात विधान परिषदेचे काँग्रेसचे गट नेते सतेज पाटील यांनी केली आहे. तर, ‘अहिंदा पॅटर्न’च्या धर्तीवर सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

बीडच्या तरुणाकडून गौतमी पाटीलला लग्नाची मागणी

राज्याच्या कानाकोपर्यात चर्चेत असणारी अभिनेत्री गौतमी पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बीडच्या एका तरुणाने पत्र लिहून गौतमी पाटीलकडे लग्नाची परवानगी मागितली आहे. ‘गौतमी पाटील तू भारी तुझ्या घरी, पण तू होती का माझी परी. मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे’ असे पत्रच या तरुणाने गौतमीला धाडले आहे. तुझ्या इच्छा-अटी सर्व मान्य असतील, असेही त्याने पत्रात नमूद केले आहे.बीड जिल्ह्यातील चिंचोलीमाळी (ता.केज) येथील रोहन गलांडे पाटील या शेतकरीपुत्राने चक्क गौतमी पाटील हिला पत्र पाठवून लग्नाची गळ घातली आहे. रोहन गलांडे याने पत्रात म्हटले आहे की, गौतमी पाटील ‘तू भारी तुझ्या घरी, पण तु होती का माझी परी?’ मी रोहन गलांडे पाटील तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. मुलाखतीत कसा जोडीदार हवाय हे सांगताना गौतमी पाटील म्हणाली होती, आता मी २५ वर्षांची आहे. लग्न करून घरसंसार थाटावा अशी माझी इच्छा आहे. फक्त मला इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नको, फक्त त्याने कोणत्याही परिस्थितीत मला साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकले, मला भाऊ नाही. त्यामुळे पुरुष मंडळीशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून इच्छा असल्याने लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे, असे गौतमीने मुलाखतीत सांगितले होते. त्याच मुलाखतीचा संदर्भ देत रोहन गलांडे पाटील याने गौतमीच्या संसाराचा भार उचलण्याची तयारी दर्शविली आहे.

कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून खासदार प्रीतम मुंडे यांचा भाजपाला घरचा आहेर

खासदारच नव्हे तर एक महिला म्हणून त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. त्यांनी केलेल्या आरोपावर वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. कुस्तीगीर महिला खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, अशी स्पष्ट भूमिका घेत सरकारकडून कुस्तीगीरांशी संवाद साधायला कोणीच गेले नसल्याची खंत भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी बुधवारी व्यक्त केली.

सीरिअन निर्वासित बाहुली जाणार अमेरिका दौऱ्यावर, स्थलांतरितांविषयी करणार जनजागृती

स्थलांतरितांबद्दलची जागृकता वाढवण्याकरता एक सीरिअन निर्वासित बाहुली येत्या काळात अमेरिकेचा दौरा करणार आहे. १२ फुटांच्या या बाहुलीचं नाव अमल असून तिचं स्वरुप १० वर्षांच्या मुलीसारखं आहे. युएस कॅपिटल, बोस्टन कॉमन, जोशुआ ट्री नॅशन पार्क आणि एडमंड पेट्स ब्रिज येथे ती भेटी देणार आहे. ७ सप्टेंबरपासून हा दौरा सुरू होणार असून ५ नोव्हेंबरला युएस मेक्सिकोच्या सीमेवर हा दौरा संपेल.या बाहुलीचे कलादिग्दर्शक निझार झुआबी म्हणाले की, “फिलाडेल्फिया, बाल्टिमोर, पिट्सबर्ग, डेट्रॉईट, शिकागो, अटलांटा, टेनेसी शहरे नॅशव्हिल आणि मेम्फिस, न्यू ऑर्लीन्स, ऑस्टिन, ह्यूस्टन, सॅन अँटोनियो आणि एल पासोची टेक्सास शहरे तसेच लॉसच्या कॅलिफोर्नियातील एंजेलिस आणि सॅन दिएगोमध्ये हे थांबे नियोजित करण्यात आले आहेत.” या ठिकाणी लिटल अमलचे प्रयोग होणार आहेत. या प्रयोगातून ती निर्वासित आणि स्थलांतरितांचे मुद्दे मांडेल.

कर्नाटकातील चामराजनगरमध्ये हवाई दलाचं विमान कोसळलं, दोन्ही पायलट सुरक्षित

कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील बोगापुरा गावाजवळ भारतीय हवाई दलाचं ट्रेनिंग विमान कोसळलं. नियमित उड्डाणानंतर हे विमान काहीच वेळानंतर एका शेतात कोसळलं, जमिनीवर पडताच या विमानाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि काही मिनिटात आग विझवली. सुदैवाने दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर उड्या मारल्या होत्या.

Renault चा मोठा रेकॉर्ड; भारतात ११ वर्षांमध्ये केली तब्बल ९ लाख गाड्यांची विक्रमी विक्री

Renault ही एक फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करत असते. मात्र कंपनीसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे रेनॉल्ट कंपनीने ११ वर्षांमध्ये तब्बल ९ लाख गाड्यांची विक्री केली आहे. तसेच विक्री करत असताना कंपनीने विविध प्रॉडक्ट्सच्या पोर्टफोलिओने देशातील ग्राहकांच्या विविध गरजा आणि प्राथमिकता पूर्ण केली आहे.रेनॉल्ट कंपनीचे देशामध्ये ४५० पेक्षा जास्त विक्री आणि ५३० सर्व्हिस स्टेशन्सचे नेटवर्क आहे. हे नेटवर्क कंपनीच्या प्रत्येक ग्राहकाला मदत आणि व्यक्तिगत सर्व्हिस देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते.

बुद्धिबळामध्ये भारत सर्वश्रेष्ठ बनण्याच्या उंबरठय़ावर; मॅग्नस कार्लसन

बुद्धिबळ खेळात भारताने चांगली प्रगती केली आहे आणि योग्य दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. एकूणच बुद्धिबळात भारत सर्वश्रेष्ठ बनण्यास फार वेळ लागणार नाही, असे मत पाच जगज्जेतेपद मिळवणाऱ्या मॅग्नस कार्लसनने व्यक्त केले.कार्लसन सध्याचा जलदगती प्रकारातील जगज्जेता असून, सध्याच्या पिढीतील एक लोकप्रिय खेळाडू आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या पहिल्या ग्लोबल चेस लीगसाठी टेक महिंद्रा आणि जागतिक बुद्धिबळ संघटनेने कार्लसनला करारबद्ध केले. त्या वेळी बोलताना कार्लसनने भारतातील बुद्धिबळ प्रगतीचे कौतुक केले. ‘‘भारतीय बुद्धिबळ खेळाडू खूप चांगली कामगिरी करत आहेत. जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंची चांगली छाप आहे. गेल्या वर्षी भारताने ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’चेही यशस्वी आयोजन केले होते. लवकरच तो दिवस येईल, जेव्हा बुद्धिबळात भारत एक आघाडीचे राष्ट्र म्हणून गणले जाईल,’’ असे कार्लसन म्हणाला.

WTC Final 2023: टीम इंडियाचा पराभव करण्यासाठी स्टीव्ह स्मिथने आखली रणनिती

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ७ जूनपासून इंग्डलच्या ओवल मैदानात होणार आहे. दोन्ही संघ इंग्लंडला पोहोचले आहेत आणि या सामन्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान कांगारु टीमचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत स्मिथ वेगळ्या अंदाजात फलंदाजी करताना दिसत आहे. स्मिथचा फलंदाजीचा सराव करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध होणारा हा सामना जिंकायचा असेल, तर स्टीव्ह स्मिथला मोठ्या जबाबदारीनं खेळावं लागेल आणि यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. आयसीसीने स्मिथचा फलंदाजीचा सराव करत असल्याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत स्मिथ वेगळ्या स्टाईलच्या बॅटने फलंदाजी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आयसीसीने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, जेव्हा स्टीव्ह स्मिथ खेळपट्टीवर असेल, तेव्हा काहीतरी मनोरंजन करेल, याची अपेक्षा ठेऊयात.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.