विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली; उद्याच जाहीर होणार 10वीचा निकाल?
महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होऊन काही दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. साधारणतः बारावीचा निकाल लागल्यानंतर काहीच दिवसात महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Ssc Result 2023) जाहीर करण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक आता शिगेला आहे. त्यानुसार आता सूत्रांकडून दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट आली आहे.सूत्रांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल या आठवड्यातच जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही रिपोर्ट्सनुसार दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result 2023) उद्याच म्हणजेच 1 जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र यासंबंधीची घोषणा आज बोर्डाकडून केली जाऊ शकते असं काही सूत्रांचं म्हणणं आहे. हा निकाल याच आठवड्यातच जारी केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव; मंत्री गिरीश महाजनांकडून घोषणा
बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं जाणार आहे. याबाबतची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. राज्य सरकारने त्यासंबंधीचं परीपत्रक जारी केलं आहे. काही वेळापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यादेवी होळकर नगर केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यापाठोपाठ आता बारामतीतल्या वैद्यकीय महाविद्यालयाला आहिल्यादेवींचं नाव देण्याचा निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.
विदर्भाच्या उकाड्यानं चालत्या गाडीत अंडी उबली; कोंबडीची पिल्लंच बाहेर आली
नागपूर आणि विदर्भातील उन्हाळा हा सहसा तीव्रच असतो. मात्र, यंदाचा उन्हाळा हा अधिक तीव्र आहे. विदर्भात गेले अनेक दिवस तापमान सतत 42 ते 43 अंशांच्या वर आहे. माणूसच नाही तर निसर्गावरही याचा गंभीर परिणाम होत आहे. याची प्रचिती देणार एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तापमानामुळे एका टेम्पोतून वाहतूक केल्या जाणाऱ्या कोंबडीच्या अंड्यांतून चक्क पिल्ल बाहेर येत आहेत.मुळात अंड्यातून पिल्ल बाहेर येण्यासाठी उब मिळणं गरजेच आहे. मात्र, वैदर्भीय तापमानामुळे अंड्याला कोंबडी शिवाय तापमानातील ऊब मिळून पिल्ल बाहेर येत आहेत. काल दुपारी नागपूरवरुन भंडाऱ्याकडे जाणाऱ्या एका अंड्याच्या गाडीत असा प्रकार घडला. नागपुरातील महामार्ग पोलिसांनीच हा व्हिडिओ शुट केला आहे. अंड्याची ती गाडी नागपुरातून भंडाऱ्यातील हॅचरीजमध्ये जात असताना ही घटना समोर आली आहे. ते काही असलं तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अहमदनगरचं नाव ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आज आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर आहेत. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यादेवी होळकर नगर असं व्हावं ही इच्छा व्यक्त केली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच त्यांच्या भाषणात घोषणा केली की, सर्वांची इच्छा आहे, त्यामुळे आपण अहमदनगरचं नाव बदलून आहिल्यादेवी होळकर नगर असं केलं जाणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
महाराष्ट्रासह देशभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
मान्सूनचा भारतातील प्रवेश अवघ्या काही दिवसांवर आला असताना भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांच्या स्थिरतेनंतर नैऋत्य मान्सून यावेळी बंगालच्या उपसागरात पोहोचला आहे. मान्सून आता वेगाने पुढे सरकत असून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. महाराष्ट्रातही कधी पाऊस पडतो तर कधी कडक ऊन पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल कठोर हिंदुत्ववादी; असदुद्दीन ओवैसी यांनी आपला पाठिंबा देण्यास केला विरोध
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकूमाच्या विरोधासाठी विरोधी पक्षांचा पाठिंबा मागत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेटही घेतली. मात्र ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केजरीवाल यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. आपचे प्रमुख केजरीवाल कठोर हिंदुत्वाची भूमिका घेऊन चालतात, असा आरोप त्यांनी केला आहे.ओवैसी म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांनी कलम ३७० बाबत भाजपाला पाठिंबा का दिला? आता ते का रडत आहेत? मी अरविंद केजरीवाल यांना अजिबात पाठिंबा देणार नाही. कारण ते सौम्य हिंदुत्ववादी नसून कठोर हिंदुत्ववादी आहेत.” ५ ऑगस्ट २०१९ रोजी जेव्हा कलम ३७० हटविण्यात आले, तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी भाजपाचे गुणगाण गात केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला होता.
कुस्तीपटूंना आता भाजपाच्या नेत्यांचाही पाठिंबा; शेतकरी नेते महापंचायत भरवून खेळाडूंना समर्थन देणार!
भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंना आता भाजपामधूनही पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. जंतरमंतर येथे आंदोलन करत असताना भाजपा वगळता अनेक पक्षांचे नेते खेळाडूंना भेटण्यासाठी येत होते. मात्र २८ मे रोजी खेळाडूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मंगळवारी आपली पदके गंगेत वाहण्यासाठी सर्व खेळाडू हरिद्वार येथे पोहोचले. मात्र काही शेतकरी नेत्यांनी मध्यस्थी करत खेळाडूंची मनधरणी केली आणि त्यानंतर पदके विसर्जित करण्याचा निर्णय काही काळासाठी मागे घेण्यात आला. हरयाणामधील भाजपाचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनीही आता खेळाडूंच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केली आहे.
दिल्लीनंतर आता ‘या’ राज्यातल्या महिला बसमधून मोफत प्रवास करू शकणार, सरकारची मोठी घोषणा
काही दिवसांपूर्वीच कर्नाटक राज्याची विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष विजयी ठरला. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत. आता कर्नाटक राज्यातील कॉंग्रेस सरकारने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसशासित कर्नाटकात महिलांना आता सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी मंगळवारी (३० मे २०२३) या संदर्भात घोषणा केली. राज्यातील सर्व शासकीय बसमध्ये सर्व महिलांना मोफत प्रवास करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
“जर कुस्तीपटूंना योग्य न्याय नाही मिळाला, तर…”, राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलापासून कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे. पण, २८ मेला नव्या संसद भवनासमोर आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यानंतर ३० मे कुस्तीपटू आपली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी हरिद्वार येथे गेले होते. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित लक्ष घालण्याची मागणी केली आहे.राज ठाकरे म्हणाले की, “सन्मा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती.”
SD Social Media
9850 60 3590