केंद्रीय मंत्री असणाऱ्या जावडेकरांनी महाराष्ट्र सरकारवर करोनाच्या लसींचा पूर्णपणे वापर न केल्याचा आरोप केला आहे. जावडेकरांनी ट्विटवरुन हा आरोप केला आहे. “महाराष्ट्र सरकारने राज्यात पाठवण्यात आलेल्या ५४ लाख लसींपैकी १२ मार्चपर्यंत केवळ २३ लाख लसी वापरल्या आहेत. ५६ टक्के लसी वापरण्यात आलेल्या नाहीत. आता शिवसेनेचे खासदार राज्यासाठी अधिक लसींची मागणी करत आहेत,” असं जावडेकर ट्विटमध्ये म्हणाले आहेत. शिवाय पुढे त्यांनी, “आधी महामारीवर नियंत्रण मिळवताना नियोजनाचा अभाव आणि आता लसीकरणामध्ये वाईट कामगिरी,” असा टोला महाराष्ट्र सरकारच्या काराभारावर नाराजी व्यक्त करताना लगावला आहे.
महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मात्र लसीकरण आणि करोना परिस्थितीवरुन राजकारण सुरु झालं आहे. महाराष्ट्र सरकारने ५६% लसी वापरल्याच नसल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जावडेकरांना उत्तर दिलं आहे.
जावडेकरांनी महाराष्ट्र सरकारवर केलेल्या टीकेसंदर्भात जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी केंद्राचं देशातल्या लसीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. भारतात लस नसली तरी चालेल पण परदेशात पाठवा असं केंद्राचं धोरण असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. किती लसी आल्या याची संख्या तर माझ्याकडे नाहीय. ती संख्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे असणार. जगभरात खास करुन पाकिस्तान जे आपलं मित्र राष्ट्र आहे त्याला आपण लसीकरणाला मदत करत आहोत, असं सांगतानाच पाटील यांनी भारतामध्ये लसींचा तुटवडा जाणवत असल्याचंही म्हटलं आहे.