मशिदीवर भोंगे, इतरांनी करू नये सोंगे : रामदास आठवले

रामदास आठवलेंचा राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध!
मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या दोन गोष्टींवरून सध्या जोरदार राजकारण सुरू असल्याचं महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंगे न हटवल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन केलं.

ठाण्यातल्या उत्तर सभेत त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्या नेहमीच्या सामन्यामध्ये मनसेची देखील जोरदार उडी झाली आहे. त्यात आता रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नवी मुंबईत माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंना मशिदीवर भोंगे, इतरांनी करू नये सोंगे, अशा खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

याआधी देखील रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना शरद पवारांबद्दल घेतलेल्या भूमिकेवरून विरोध केला होता. “शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करत नाहीत, पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जातीपातीचे राजकारण करतात”, असं रामदास आठवले म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

माझं म्हणणं असं आहे की वाद निर्माण करणारी वक्तव्य कुणी करू नये. संविधानाच्या विरोधात कुणी भूमिका घेऊ नये. प्रत्येकाला घटनेनं स्वातंत्र्य दिलं आहे. कुणाचं तोंड आपण बंद करू शकत नाही. पण बोलत असताना आपण काय बोलतोय, याचं भान ठेवलं पाहिजे. परंपरागत पद्धतीने मशिदींवर भोंगे आहेत. मशिदीवर आहेत भोंगे म्हणून बाकीच्यांनी करू नयेत सोंगे. म्हणजे त्यांनी असं उलट-सुलट बोलून दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.