कोरोनामुळे ४० लाख भारतीयांचा
मृत्यू ,राहुल गांधी यांचा दावा
करोनाच्या संकटातून सध्या देश लढत पुढे जात आहे. पहिल्या लाटेपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेपर्यंत करोनाने देशातील करोडो लोकांना वेठीस धरले. त्याचवेळी, सरकारी आकडेवारीनुसार, देशातील करोनामुळे मृतांचा आकडा पाच लाख २१ हजार ७५१ वर पोहोचला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे आकडे खोटे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. करोनामुळे पाच लाख नाही तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की, सरकारच्या निष्काळजीपणामुळे करोना व्हायरसमुळे ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे.
सोशलमीडिया वरील पोस्टमुळे
कर्नाटकात हिंसाचार, बारा पोलीस जखमी
कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील जुन्या हुबळी पोलीस स्टेशनवर रात्री जमावाने केलेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर ४० जणांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकासह १२ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर केला, अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिंसाचारानंतर शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. याशिवाय जमावाने पोलिसांच्या काही वाहनांची देखील तोडफोड केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
२०२४ मध्ये आता ही जागा आम्ही
१०० टक्के जिंकणार : फडणवीस
आम्हाला मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत, अतिशय मोठ्याप्रमाणात आमच्याकडे मतदार वळलेला आहे. आम्ही वारंवार जे सांगत होतो की ही जी पोकळी आहे ती आम्ही भरून काढत आहोत. ती काल केल्याचं दिसलेलं आहे, कारण एकटे लढलो तरी जेव्हा भाजपा आणि शिवसेना एकत्र लढलो होतो त्यापेक्षा जास्त मतं आहेत. ते तिघं लढले तरी त्यांची मतं वाढलेली नाही. आताचा मत हे सहानुभूतीचं मत आहे. २०२४ मध्ये आता ही जागा आम्ही १०० टक्के जिंकणार या बद्दल खात्री आहे.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
तुमची ही भूमिका राज्यात दंगली व्हाव्यात
अशाच हेतूची दिसते : छगन भुजबळ
एका बाजूला मुख्यमंत्र्यांचे ऑपरेशन होत आहे आणि तरीही ते सरकार चालवण्यासाठी शर्थ करताना दिसताहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी विघ्न बनवू नका. आपल्या चुलत भावाला जगू द्या. सरकार नीट सुरू आहे, कशाला अडचणीत आणता असा जेष्ठत्वाचा सल्ला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिलाय.
राज ठाकरे यांनी मस्जिदीवर असणारे भोंगे हटविण्यासाठी ३ तारखेपर्यंत मुदत दिलीय. राज ठाकरे हा ‘दंगली’ माजविण्याचा हेतू नाही ना? तुमची ही भूमिका राज्यात दंगली व्हाव्यात आणि सर्वसामान्य माणसं होरपळून निघावेत अशाच हेतूची दिसते. त्यानंतर हे केवळ किती लोक गेली हे मोजत राहणार असा उपरोधीक टोलाही त्यांनी लगावला आहे.
‘मी आंबेडकरांचा भक्त, अंधभक्त नाही’ मुख्यमंत्री ठाकरेंचा रोख कुणाकडे?
‘सध्या अंधभक्तांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अंधभक्त सोईनुसार भूमिका घेत असतात. पण मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भक्त आहे, अंध भक्त नाही’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला.ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा विमोचन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे हजेरी लावली.
‘आयत्या बिळात नागोबा’, प्रितम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर खतरनाक निशाणा
बीडमध्ये मुंडे बंधू-भगिणींमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असतात. भावा-बहिणींमधील राजकीय वाद आतादेखील शिगेला पोहोचला आहे. अर्थात अशाप्रकारचा वाद होण्याची ही पहिली वेळ नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांच्यातील टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. तर त्यांचे भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे विजयी झाले होते. मात्र या निवडणुकीनंतरही त्यांच्यातील राजकीय संघर्ष बघायला मिळतोय. विशेष म्हणजे यावेळी तर भाजप खासदार प्रितम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. विकासकामांच्या श्रेयवादावरुन प्रितम मुंडे यांनी धनंजय यांना उद्देशून ‘आयत्या बिळात नागोबा’, असा उल्लेख केला आहे.
हनुमान चालीसा तुम्हाला पाठ
आहे का : अमोल मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्याविरुद्ध हनुमान चालिसा लावण्याच्या घोषणेवर सडकून टीका केली. “हनुमान चालिसा हनुमान चालिसा काय लावलं आहे. तुमच्या एकाही पदाधिकाऱ्याला हनुमान चालिसा मुखोद्गत (पाठ) नाही. तुम्हालाही दोन ओळी म्हणता आल्या नाहीत,” असं म्हणत अमोल मिटकरी यांनी थेट राज ठाकरेंवर हल्ला चढवला. मिटकरी यांनी व्हिडीओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले, आम्ही हनुमान चालिसा लहानपणापासून पाळण्यात शिकलेली हिंदू माणसं आहोत. तुलसीदासांनी इतकं सुंदर हनुमान चालिसा लिहिलं आहे. रामचरितमानसवर उर्दु शब्दांचाही प्रभाव आहे. हे तुम्ही कबुल करा. मुस्लिमांचा विरोध करू नका.
राज ठाकरे हे ५ जून रोजी
अयोध्या दौऱ्यावर जाणार
राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेतली. हनुमान चालिसा पठणावरुन आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून सध्या जोरदार टीका होत आहे. त्यानंतर आज राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन टीकाकारांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
त्यांनी मातोश्रीवर येऊनच
बघावे : उदय सामंत
शिवसेना नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार नवनीत राणा यांना जाहीर आव्हान दिलं आहे. “मुख्यमंत्र्यांवर बोलणं ही सध्या फॅशन झाली आहे. त्याच्यामुळे टीआरपी वाढतो. ज्यांचं अस्तित्व नष्ट झालं आहे, जे अनेक पक्ष फिरुन आले आहेत त्यांनादेखील एक मंच मिळतो. माझं तर आव्हान आहे की, मातोश्री दूर राहिलं, अमरावतीच्या एखाद्या शाखा प्रमुखाच्या घरासमोर जाऊन आरती करावी, हनुमान चालिसा म्हणावी. ती तारीख आणि वेळ माझ्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला द्यावी. तर त्यांचं फार मोठं कर्तृत्व आहे,” असा टोला सामंत यांनी लगावला आहे.
आमदार गणेश नाईक यांना
अटक होण्याची शक्यता
भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गणेश यांच्यावर जीवे ठार मारण्याची धमकी आणि इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गणेश नाईक यांच्याविरुद्ध नवी मुंबई आणि नेरुळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गणेश नाईक यांना अटक करुन पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
पराभवाच्या सिक्सरनंतर मुंबई ‘लाज’ तरी वाचवणार?, इतिहासातल्या खराब कामगिरीची टांगती तलवार
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. या मोसमातल्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. एकही विजय न मिळवलेली मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. पहिल्या 6 मॅच गमावल्यामुळे आता मुंबईचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणंही जवळपास अशक्य झालं आहे. आयपीएलच्या 15 मोसमांमधली मुंबईची ही सगळ्यात खराब सुरूवात आहे. आयपीएलमध्ये प्रत्येक टीम लीग स्टेजमध्ये 14 मॅच खेळते, यानंतर पॉईंट्स टेबलमधल्या टॉप-4 टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतात. आयपीएलच्या लीग स्टेजच्या 14 मॅचनंतर सगळ्यात खराब कामगिरी दिल्ली आणि हैदराबादच्या नावावर आहे.
‘वर्किंग मॉम’ असल्यामुळे भारती सिंग ला ऐकावी लागली बोलणी, कॉमेडियनने व्यक्त केलं दु:ख
कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया सध्या आई-बाबा झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. भारती आणि हर्ष सध्या त्यांच्या बाळाच्या अवतीभोवती व्यस्त असले तरी ते त्यांचे वर्क कमिटमेंट्स देखील पूर्ण करताना दिसत आहेत. त्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर 12 दिवसांनीच ती कामावर परतली आहे. मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच कामावर परतणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. बाळाला घरी ठेवून येण्याशिवायच लोकांची बोलणीही तिला ऐकावी लागली होती. भारतीने खुलासा केला की वर्किंग मॉम असल्यामुळे लोकांनी तिच्यावर अनेक कमेंट्स केल्या आणि तिला टोमणेही मारले. आजतकला दिलेल्या एका मुलाखतीत भारती सिंहने असे म्हटले की, आई होणार असूनही काम करत असल्याने तिला अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या. भारती या मुलाखतीत म्हणाली, ‘लोकं म्हणतात की मूल लहान आहे आणि ही कामावर परतली आहे. पैशाची एवढी काय गरज आहे.’ ती म्हणाली की पण अशा काही कामाच्या कमिटमेंट्स होत्या ज्यामुळे तिला कामावर परतावे लागले.
SD social media
98 506035 90