निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षित जागा ठरवण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. परंतु हा कार्यक्रम म्हणजे निवडणुकांची तारीख नव्हे. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा संकलित करण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल आणि ओबीसींना आरक्षण मिळेल, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ओबीसी आरक्षणाचे काय? याकडे भुजबळ यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ओबीसींना लवकरच आरक्षण मिळेल,अशी आशा व्यक्त केली.
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेले वादग्रस्त विधान व त्यामुळे सुरू असलेले आंदोलने याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, शर्मा यांचे विधान चुकीचे आहे. त्यांच्यावर भाजपने कारवाई केली असली तरी लोकांचा संताप कमी झाला नाही. शर्मा यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यावर कारवाई होईल. तोपर्यंत लोकांनी संयम बाळगावा.
मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून न्यायप्रविष्ठ असल्याने त्याबाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. मराठा कार्यकर्ते आणि समाजामध्ये एक प्रकार निराशेचे वातावरण दिसून येत आहे.