भारतातील ओमिक्रॉनचं संकट आता हळूहळू वाढत असल्याचं दिसतंय. देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 151 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉन बाधितांची महाराष्ट्रातील संख्या 54 वर तर नवी दिल्लीतील संख्या 22 झालीय. तर, आता कोरोना बाधितांची संख्या देखील वाढू लागली आहे. महाराष्ट्रात रविवारी 902 रुग्णांची नोंद झालीय. तर राजधानी नवी दिल्लीत देखील 107 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉनसह कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढलीय.
महाराष्ट्रातील ओमिक्रॉनची संख्या 54 वर
महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळला होता. त्यानंतर आता हळू हळू रुग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्यात रविवारी दिवसभरात ओमिक्रॉनचे सहा नवीन रुग्ण आढळून आले असून या रुग्णांची संख्या 54 झाली आहे. सहा रुग्णांपैकी एक रुग्ण मुंबई, औरंगाबाद, पुणे आणि पिंपरी चिचवडचा आहे.
राज्यात दिवसभरात कोरोनाच्या 902 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि 9 मृत्यू झाले आहेत. राज्यात दिवसभरात 767 कोरोनामुक्त झाले असून उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 7068 झाली आहे. तर, रविवारी दिवसभरात 201 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 300 च्या आसपास दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद होत होती. त्यानंतर ही संख्या कमी कमी होत होती. महिनाभर दररोज केवळ दोनशेच्या आत नवीन रुग्ण आढळून येत होते. मात्र, डिसेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढू लागल्याचं पाहायला मिळतंय.