देशात लसीकरणाच्या सुरू असलेल्या घोळावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी भाष्य केलं आहे. लसीकरण सुरू करताना व्हॅक्सिनचा उपलब्ध स्टॉक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्सकडे लक्ष दिलं गेलं नाही. स्टॉक नसल्याचं माहीत असूनही लसीकरण मोहीम राबवण्यात आली, अशी टीका सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
एका कार्यक्रमावेळी सुरेश जाधव यांनी ही टीका केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेची गाईडलाईन्स लक्षात घेऊन लसीकरणाला प्राधान्य द्यायला हवे होते. सुरुवातीला 30 कोटी लोकांना व्हॅक्सिन द्यायची होती. त्यासाठी 60 कोटी डोसची गरज होती, असं जाधव म्हणाले.
लसीकरण सुरू झाल्यानंतर आम्ही टार्गेटपर्यंत पोहोचतच होतो. तेव्हा सरकारने 45 वर्षांवरील आणि नंतर 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे लसीचा एवढा स्टॉक नाहीये हे सरकारला माहीत होतं. तरीही त्यांनी हा निर्णय घेतला. यातून उत्पादनाची उलब्धता पाहिली पाहिजे आणि न्यायसंगत पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे, हे आपल्याला शिकायला मिळते, असंही ते म्हणाले.
व्हॅक्सिनची गरज आहे. मात्र, लसीचा डोस मिळाल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याच्या केसेस दिसून येत आहेत. त्यामुळे लोकांनी सतर्क राहिले पाहिजे. व्हॅक्सिनेशननंतरही कोरोनाच्या गाईडलाईन्स पाळल्या पाहिजे. व्हेरिएंटच्या डबल म्युटेटंला न्यूट्रलाईज करण्यात आलं आहे. तरीही व्हेरिएंट व्हॅक्सिनेशनच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, असं ते म्हणाले. कोणती व्हॅक्सिन प्रभावी आहे आणि कोणती नाही हे आताच सांगू शकत नाही. सीडीसी आणि एनआयएचच्या डेटानुसार जी व्हॅक्सिन उपलब्ध आहे, ती घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले.