मराठमोळ्या पायलटने वाचविले 186 मच्छिमारांचे प्राण

तौक्ते चक्रीवादळात सातारच्या सुपुत्राने महत्वपूर्ण कामगिरी केली. पाटण तालुक्यातील सणबुरच्या या सुपुत्राचं नाव शिवम जाधव असं आहे. ते भारतीय नौदलात लेफ्टनंट पायलट पदावर आहेत. त्यांनी नौदलातील आपल्या सहकाऱ्यांसोबत तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 186 मच्छिमारांचे प्राण वाचवले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या शौर्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिवमच्या कामगिरीची सणबुर ग्रामस्थांना माहिती मिळताच गावकऱ्यांचे उर अभिमानाने भरुन आले आहेत. त्यांनी शिवमसह त्याच्या आई वडीलांचंही जोरदार कौतुक केलं

तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या 186 मच्छिमारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात लेफ्टनंट पायलट शिवम विठ्ठल जाधव आणि त्यांच्या नौदलातील सहकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका होती. म्हणूनच याची दखल नौदल प्रमुखांपासून संरक्षण मंत्र्यांपर्यंत सर्वांनी घेतली. यामुळे सातारा जिल्ह्याच्या शौर्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

तौक्ते वादळ मुंबई येथे धडकताच ताशी 120 ते 140 वेगाने वारे वाहत होते. वादळामुळे समुद्रातील जहाजे व मच्छिमारांच्या नौका उलटल्या. मंगळवारी (18 मे) सायंकाळी चक्रीवादळामुळे मुंबई येथील अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक मच्छीमार भयानक वादळात अडकून पडले. काही जहाजावरील कर्मचारी भरकटल्याची खबर मुंबई येथील भारतीय नौदल अधिकार्‍यांना मिळाली. याच वेळी नौदलाचे लेफ्टनंट पायलट शिवम जाधव यांनी आपल्या नौदलातील सहकाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.

रात्रीची वेळ असल्याने अंधाराचा सामना करीत त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून मदतकार्य केले. आयएनएस कोलकाता या लढावु युद्ध नौकेवर लेफ्टनंट पायलट शिवम जाधव यांच्यासह तैनात असणाऱ्या जवानांनी प्राणाची तमा न बाळगता, येईल त्या प्रसंगाला तोंड दिलं. विद्ध्वंसकारी चक्रीवादळाचा सामना करत त्यांनी लोकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यावेळी वादळात अडकलेल्या 186 मच्छिमारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. या कामात जहाजावरील पायलट शिवम जाधव यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या कामगिरीचे नौदल प्रमुखांनी व संरक्षणमंत्री यांनी कौतुक केले. या कामगिरीची ग्रामस्थांना माहिती मिळताच शिवम जाधव यांच्यासोबत त्यांचे वडील विठ्ठल जाधव आणि आई संगिता जाधव यांचंही कौतुक करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.