मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता. ते खरंच देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत, अशी खोचक टिप्पणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तौत्के चक्रीवादळामुळे हानी झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र, विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या या धावत्या भेटीवर टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्र्यांनी विमानतळापासून मोजून 10 किलोमीटर अंतरावरील भागांची पाहणी केली. आतमध्ये जाऊन कुठल्याही गावाला भेट दिली नाही. ‘यालाच म्हणतात “lipstick” दौरा, अशी खरमरीत टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती.
तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका उद्वव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती.
कोकणात आलेलं चक्रीवादळ भीषण होतं. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.