करोना उपचारांमध्ये
रेमडेसिविरही होणार हद्दपार?
काही दिवसांपूर्वीच करोनाच्या उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. आता लवकरच करोनाच्या उपचारांमध्येही मोठे बदल होऊ शकतात. करोनाच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारी औषधं आणि त्यांच्याविषयीने प्रोटोकॉल ठरवून देणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीने अनेक औषधांबद्दल संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. सर्वात जास्त चर्चा रेमडेसिविर या इंजेक्शनची आहे. संशोधनानंतरच रेमडेसिविरबद्दलचाही निर्णय घेण्यात येईल. जागतिक आरोग्य संघटनेनेही रेमडेसिविरचा फारसा उपयोग होत नसल्याचं सांगितलं होतं व त्याला उपचारातून हद्दपार करण्याची शिफारसही केली होती.
एनईएफटी (NEFT) सेवा 23 मे
रोजी 14 तासांसाठी बंद
आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) ट्विट करुन ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी वापरली जाणारी एनईएफटी (NEFT) सेवा उद्या म्हणजेच 23 मे रोजी 14 तासांसाठी बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. एनईएफटीद्वारे द्वारे आपण भारतातील कोणत्याही ठिकाणी बँकेच्या शाखेत न जाता पैसे पाठवू शकतो. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर सिस्टीम (NEFT) संपूर्ण देशात वापरली जाते. या सेवेद्वारे पैसे पाठवण्यासाठी किमान किंवा कमाल मर्यादा नसते.
पहिलवान सुशील कुमार आणि
त्याच्या टोळक्या क्रूरता समोर
पहिलवान सागर धनखड हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदकविजेता पहिलवान सुशील कुमार याचा अद्याप सुगावा लागलेला नाही. या घटनेचे छत्रसाल स्टेडिअममधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सुशील कुमार आणि त्याच्या टोळक्या क्रूरता समोर आली आहे. यामध्ये सुशील कुमार याच्यासह २०- २५ पहिलवान आणि असौदा येथील टवाळखोरांची टोळी सागर धनखडसह इतर दोघांना जनावरांसारखी मारहाण करतानाचे दृश्य कैद झाले आहे. सर्व संशियत सागरला लाथा-बुक्क्या, काठ्या, बॅट, हॉकीच्या बॅटने मारहाण करताना सीसीटीव्हीत व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
लालू प्रसाद यांच्या विरोधातला
तपास सीबीआयने थांबवला
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणाचा प्राथमिक तपास सीबीआयने थांबवला आहे. कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने २०१८ पासून सुरु असलेला हा तपास थांबवण्यात आला.
आपण वारंवार स्वत:च खजील
होण्यासारख्या गोष्टी का करत आहोत
उत्तराखंड उच्च न्यायालयानंच उत्तराखंड राज्य सरकारचे कान उपटले आहेत. “आधी आपण कुंभमेळ्याची चूक केली, आता चारधाम यात्रा. आपण वारंवार स्वत:च खजील होण्यासारख्या गोष्टी का करत आहोत?” अशा शब्दांत राज्य सरकारला सुनावतानाच “तुम्ही कोर्टाला फसवू शकता, पण लोकांना नाही. हेलिकॉप्टर घ्या, जा आणि बघा केदारनाथ-बद्रीनाथला काय सुरू आहे”, अशा कठोर शब्दांत उच्च न्यायालयानं सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढले आहेत. या संदर्भात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं आक्षेप घेतला.
म्युकरमायकोसिसच्या
लढ्यासाठी यंत्रणा सज्ज
विविध राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर अॕम्फोटेरिसिन बी औषधाच्या एकूण २३६८० अतिरिक्त कुप्या आज सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आल्या आहेत असे केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी जाहीर केले आहे. देशभरातल्या अंदाजे ८८४८ रुग्णांच्या संख्येच्या आधारे हे वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
आयएमएनं केली योगगुरु रामदेव यांच्यावर
कारवाई करण्याची मागणी
योगगुरु रामदेव यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे. “एक तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी योगगुरु रामदेव यांनी केलेले आरोप मान्य करावे आणि आधुनिक उपचार पद्धती रद्द करावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याविरोधात साथ नियंत्रक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा”, अशी मागणी त्यांनी पत्रकात केली आहे.
ज्येष्ठ संगीतकार लक्ष्मण
यांचे नागपूर येथे निधन
प्रसिद्ध व ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचे नागपूर येथे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होती. अखेर शुक्रवारी (दि. २१) रात्री १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राम लक्ष्मण यांच्या नावावर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकापेक्षा एक दमदार गाणी दिली. यात ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ या चित्रपट आणि त्यातील गाण्याचा समावेश आहे. तसेच त्यांनी राजश्री प्रोडक्शनच्या सिनेमांना संगीत दिले आहे.
सोशल मीडिया कंपनींना इंडियन
व्हेरियन्टबाबतचा मजकूर काढावा
करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य यंत्रणा पुरती हतबल झाल्याची दिसून आली. त्यात रोज वाढणारे रुग्ण आणि मृतांची संख्या पाहता इतर देशांनी धसका घेतला. त्यामुळे भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली. त्यात इंडियन व्हेरियंटमुळे अनेक देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. तसेच सोशल मीडियावरही इंडियन व्हेरियंटची चर्चा रंगू लागली आहे. यामुळे भारताच्या प्रतिमेला तडा जात असल्याने माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपनींना इंडियन व्हेरियन्टबाबतचा मजकूर काढण्यास सांगितले आहे.
मुंबईच्या किनाऱ्यावर
डायव्हिंग टीम तैनात
चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीवरील सगळ्याच राज्यांमध्ये विध्वंस केला आहे. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. आतापर्यंत २६ लोकांचा मृत्यू झालेला आहे. चक्रीवादळाच्या सहा दिवसांनंतर बचावकार्य वेगाने करण्यासाठी शनिवारी (२२ मे) नौदलाने मुंबईच्या किनार्यावर डायव्हिंग टीमला तैनात केले आहे. शनिवारी सकाळीच टीमला रवाना करण्यात आले आहे. बजरा पी ३०५ आणि वरप्रदाचे बेपत्ता चालक दलाला शोधण्यासाठी विशेष डायव्हिंग टीमला आयएनएस मकर जहाजावर तैनात केले आहे. सोबत साईड स्कॅन सोनार आणि आयएनएस तरासासुद्धा तैनात आहे, अशी माहिती नौदलाचे प्रवक्त्यांनी ट्विट करून दिली.
महिन्यांत देशात लसीच्या
उत्पादनात घसघशीत वाढ
लसीकरण मोहिमेचे निर्णायक महत्त्व विशद करीत केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, भारताने नागरिकांना लसीच्या एकूण १९,१८,८९, ५०३ मात्रा दिल्या आहेत. ते म्हणाले की, देशात लस उपलब्धता वाढविण्यासाठी सरकार लस उत्पादकांना पाठिंबा देण्याच्या सक्रिय प्रक्रियेत सरकार आहे. त्यानंतरच्या महिन्यांत देशात लसीच्या उत्पादनात घसघशीत वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या कालावधीत भारत लसीच्या २१६ कोटी मात्रा खरेदी करेल तर यावर्षी जुलैपर्यंत ५१ कोटी मात्रांची खरेदी केली जाईल.
अवघ्या सतरा मिनिटात
आटोपला विवाह
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील कलान परिसरातील पाटणा येथील देवकाली शिव मंदिरात अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर हे लग्न झाले. अवघ्या १७ मिनिटांत वधू-वरांनी सात फेरे घेतले. यावेळी वराच्या डोक्यावर फेटा किंवा सेहरा नव्हता, तसेच वर घोड्यावर बसला नव्हता किंवा बॅन्ड बाजा देखील नव्हता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधांमुळे असा विवाह सोहळा संपन्न झाला.
कोविड १९ च्या वाढत्या घटनांमुळे
८२ टक्के वृद्ध आरोग्याच्या चिंतेने ग्रस्त
कोविड १९ च्या वाढत्या घटनांमुळे जवळजवळ ८२.४ टक्के वृद्ध आरोग्याच्या चिंतेने ग्रस्त आहेत. तर सुमारे ७०.२ टक्के वृद्धांना निद्रानाश, वाईट स्वप्नांचा त्रास होत आहे, असा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. गेल्या एका महिन्यात याकरिता पाच हजाराहून अधिक ज्येष्ठांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. एजवेल फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अभ्यासात असेही आढळले आहे की, सुमारे ७०.२ टक्के वृद्धांना निद्रानाश, वाईट स्वप्नांचा त्रास होतो. वृद्धांमध्ये आरोग्याची चिंता असून भीती, नैराश्य, चिडचिड, तणाव, एकटेपणाची भावना, विषाणूमुळे कोरोना बाधीत होण्याची भीती, भूक न लागणे आणि अनिश्चितता, भविष्याशी संबंधित चिंता ही त्यांना सतावत आहे.
१५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची
साथ आटोक्यात येईना
राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री श्री. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. राज्यातील बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद या १५ जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूदर अधिक असून तो कसा कमी करता येईल याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना थोरात यांनी दिले.
करोना काळातील
नवे अब्जाधीश
ऑक्सफॅमची सदस्या अॕना मॅरियट सांगतात, औषध कंपन्या लस बनविण्याच्या एकाधिकारातून खूप पैसा कमवत आहेत. सध्याच्या आठ अब्जाधीशांच्या संपत्तीत एकूण २५ अब्ज रुपयांची वाढ झाली आहे. यादीत अग्रस्थानी मॉडर्नाचे स्टिफन बँसल आणि बायोएनटेकचे उगुर साहिन आहे. तीन इतर नव्या खर्वपती चीनची लस कंपनी कॅनसिनो बायोलॉजिक्सचे संस्थापक आहेत.
नव्या अब्जाधीशांच्या यादीत मॉडर्नाचे सीईओ स्टिफेन बँसल (४.३ अब्ज डॉलर), बायोएनटेकचे सीईओ उगुर साहिन (चार अब्ज डॉलर), मॉडर्नाचे संस्थापक गुंतवणूकदार टिमोथी स्प्रिंगर (२.२ अब्ज डॉलर), मॉडर्नाचे चेअरमन नौबार अफेयान (१.९ डॉलर), आरओव्हीआयचे अध्यक्ष जुआन लोपेज बेलमॉन्टे (१.८ अब्ज डॉलर).
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग
चक्रीवादळा पेक्षाही जास्त : मनसे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता. ते खरंच देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत, अशी खोचक टिप्पणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मान्सूनचा पाऊस दाखल
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. अंदमान-निकोबार बेटावर मान्सूनच्या सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसात अंदमान बेटावर दाखल होईल असं हवामान विभागाने सांगितलं होतं. त्यानुसार मान्सूनने अंदमान निकोबार बेटावर एण्ट्री केली. जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज वर्तवला होता.
Dearness allowance (DA)
दुप्पट करण्याचा निर्णय
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने वेरिएबल Dearness allowance दुप्पट करण्याचा निर्णय घेतलाय. याचा फायदा दीड कोटी कर्मचार्यांना होणार आहे. पूर्वी व्हेरिएबल महागाई भत्ता दरमहा 105 रुपये होता, तो दरमहा वाढवून 210 रुपये करण्यात आलाय. नवीन व्हेरिएबल महागाई भत्ता 1 एप्रिल 2021 पासून लागू होईल. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारमधील कर्मचारी आणि कामगारांच्या किमान वेतनात वाढ होईल.
SD social media
9850 60 3590