निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सीसीटीव्हीत दिसणारी ती मिस्ट्री वूमन वेश्या म्हणून काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेने ‘एनआयए’ला दिलेल्या जबाबात याचा उल्लेख आहे. वाझे तिला खूप वर्षापासून ओळखायचा, वाझेनेच तिला ते काम बंद करायला सांगितलं होतं.
वाझेसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सीसीटीव्हीत दिसणारी ती मिस्ट्री वूमन वेश्या म्हणून काम करत होती. ऑगस्ट 2020 पासून सचिन वाझे त्या महिलेला दरमहा 50 हजार द्यायचा. याशिवाय वाझेने दोन तीन कंपन्यांमध्येही तिला भागीदार बनवलं होतं. सचिन वाझेने तिला 16 फेब्रुवारीला मुंबई पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमध्ये बोलावून 40 लाख रुपयांची रोख रक्कम दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.
मोजून 786 सिरीयल नंबरच्या नोटा परत कर, आणि उरलेले पैसे ठेवून घे असं सांगितलं होतं. त्यानुसार त्या महिलेने 36 लाख रुपये वाझेला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये परत आणून दिले, जे सीसीटीव्हीत दिसलं. सचिन वाझेने त्या महिलेला भागीदार बनवलेल्या मयांक ऑटोमेशन या कंपनीच्या खात्यात एनआयएला दीड कोटी रुपये सापडले होते, असा उल्लेख आरोपपत्रामध्ये आहे. वाझे तिला खूप वर्षापासून ओळखायचा, वाझेनेच तिला वेश्या व्यवसायाचं काम बंद करायला सांगितलं होतं.
दुसरीकडे, उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी अहवालात छेडछाड करण्यासाठी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी सायबर तज्ज्ञाला 5 लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप झाला आहे. एनआयएच्या आरोपपत्रात सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-उल-हिंद संघटनेचं नाव अहवालात घुसवण्यासाठी परमबीर सिंह यांनी लाच दिल्याचा आरोप आहे.