मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. भाग्यश्री मोटेची बहिण मधू मार्कंडेचा मृतदेह पिंपरी-चिंचवडच्या वाकडमध्ये सापडल्याचं वृत्त आहे, याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. भाग्यश्रीच्या बहिणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत मिळाला आहे. तिच्या चेहऱ्यावर जखमांचे निशाणही आहेत. मधूच्या चेहऱ्यावर या जखमा कशा झाल्या? याचा तपास पोलीस करत आहेत.
मधू तिच्या मैत्रिणीसोबत वाकडमध्ये केक बनवण्याचा व्यवसाय करत होती. रविवारी मधू तिच्या मैत्रिणीसोबत भाड्याने खोली बघायला गेली होती. खोली बघितल्यानंतर मधूला चक्कर आली आणि तिची दातखीळ बसली, यानंतर मैत्रिण मधूला खासगी रुग्णालयात घेऊन गेली, तिकडे मधूवर उपचार होऊ शकले नाहीत. यानंतर तिला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिकडे तिला मृत घोषित करण्यात आलं.
मधूच्या चेहऱ्यावर जखमांचे निशाण मिळाले आहेत, त्यामुळे तिचा मृत्यू संशयास्पद मानला जातोय. मधूच्या कुटुंबालाही तिच्या हत्येचा संशय आहे. वाकड पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, तसंच पुढील तपास सुरू केला आहे.
बहिणीच्या मृत्यूनंतर भाग्यश्री मोटेने तिच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये भाग्यश्री बहिणीली किस करत आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटलं की, “तू नाही आहेस?”. बहिणीच्या आठवणींमध्ये तिने आणखी दोन पोस्ट शेअर केल्या आहेत.
बहिणीच्या खांद्यावर हात ठेवत भाग्यश्रीने आणखी एक फोटो शेअर केला. “तुला मी कशी जाऊ देऊ? तू माझ्या असण्याचा भाग आहेस. शांत झोप आता. बाकी तुझी बाळ सांभाळून घेतील”. असं भाग्यश्रीने म्हटलं आहे. भाग्यश्रीची ही पोस्ट पाहून तिचे चाहतेही हळहळले आहेत.
भाग्यश्री पुढे म्हणाली की, “माझ्या प्रिय बहिणीने या जगाचा निरोप घेतला. माझी आई, बहीण, मैत्रीण सगळं काही तूच होतीस. तुझ्याशिवा मी या आयुष्याचं काय करू? तुझ्याशिवाय जगणं तू मला कधीच शिकवलं नाही. मृत्यू अटळ आहे पण मी तुला जाऊ देणार नाही”.