उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. भूषण देसाई यांच्या या प्रवेशावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भूषण देसाई आणि शिवसेनेचा काहीही संबध नाही, ते शिवसेनेचे सक्रीय सदस्य नाहीत, पण सुभाष देसाई मागची कित्येक वर्ष आमच्यासोबत आहेत. ज्यांना कुणाला वॉशिंग मशिनमध्ये जायचं आहे, त्यांनी जरूर जावं,’ असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
भूषण देसाईंचं प्रत्युत्तर
दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर भूषण देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘त्यांच्यासाठी मी खूप लहान आहे. मी त्याकाळात काम केलं आहे. माझं सामाजिक काम आहे, ते त्यांना कळेल. मी निवडणूक किंवा कोणत्याही पदासाठी इथे आलेलो नाही. पक्ष जी जबाबदारी देईन, ती मी स्वीकारणार आहे,’ असं वक्तव्य भूषण देसाई यांनी केलं आहे.
भूषण देसाई यांच्या या निर्णयावर सुभाष देसाई यांनी भावुक प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला, ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही, त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे’, असं सुभाष देसाई म्हणाले.