आज दि.५ सप्टेंबर दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या
बाबतीत उदासीन : शरद पवार

पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत असून यानिमित्ताने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव महादेव काळे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळाव्यानिमित्त शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. दुर्दैवाने केंद्र सरकार पीक दरासंसंदर्भात उदासीन असून लक्ष देत नसल्याचं ते म्हणाले आहेत.

केरळमध्ये निपाह व्हायरसची लागण
१२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

केरळच्या कोझीकोड जिल्ह्यात १२ वर्षाच्या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, या मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे. बाधित मुलाच्या शरीरातून नमुने घेण्यात आले होते. जे पुण्यातील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था (NIV) येथे पाठवण्यात आले. त्यानंतर मुलाला निपाह विषाणूची व्हायरसची लागण झाल्याते स्पष्ट झाले होते.

इन्फोसिस कंपनीबाबत
पांचजन्यला संशय

इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. ‘इन्फोसिस’ने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप आहेत, मात्र त्याचे पुरावे नाहीत, असेही ‘पांचजन्य’मधील लेखात म्हटले आहे.

कोल्हापूर परिसरात ३.९ रिश्टर
स्केल तीव्रतेचा भूकंप

कोल्हापूर परिसरात काल म्हणजे रात्री ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र विभागाने दिली आहे. ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूरच्या पश्चिमेला १९ किलोमीटर अंतरावर होता.कोल्हापूरपासून १९ किलोमीटर कळे गावाजवळ केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे.

जावेद अख्तर यांनी माफी मागावी, अन्यथा
चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही

भाजप नेते राम कदम यांनी देखील जावेद अख्तर यांंच्यावर निशाणा साधला आहे. जोपर्यंत जावेद अख्तर माफी मागत नाहीत तोपर्यंत त्याचे आणि त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे सिनेमा देशात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देखील राम कदम यांनी दिलाय. राम कदम यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते म्हणाले, ” जावेद अख्तर यांचं वक्तव्य लाजीरवाणं आहे. त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिदू परिषदेचे देशभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारं आहे.”

राज्यात येत्या चार-पाच दिवस
पुन्हा पावसाचा इशारा

विदर्भात गेल्या ८ ते १० दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच पुन्हा येत्या ४८ तासात उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

क्वेट्टा येथे मोठा आत्मघातकी हल्ला
तीन ठार, २० जण गंभीर जखमी

पाकिस्तनामधील क्वेट्टा येथे मोठा आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तीन जणांचा मृत्यू झाला असून, २० जण गंभीर जखमी झालेले आहेत. हा आत्मघातकी हल्ला घडवणारा हल्लेखोर एका दुचाकीवरून आला होते व त्यानंतर त्याने स्वतःला उडवून दिल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेने दिली आहे. याचबरोबर, या हल्लयाची जबाबदारी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान(टीटीपी) या संघटनेने घेतल्याचेही सांगण्यात आले आहे

पेट्रोल डिझेलच्या
दरांमध्ये काहीशी घट

गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढतच जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सामान्य माणूस अक्षरशः वैतागला आहे. मात्र, अशातच काहीशी दिलासादायक बातमी मिळत आहे. आज पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये काहीशी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांत सतत होणाऱ्या दरवाढीच्या तुलनेत आज झालेली घट सकारात्मक आहे.

भारताचा दुसरा डाव ३ बाद २९२,
रोहितचे विदेशातील पहिलेच कसोटी शतक

भारताने आज आपला दुसरा डाव ३ बाद २९२ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आहे. सलामीवीर रोहित शर्माची शतकी खेळी आणि त्याला चेतेश्वर पुजाराची लाभलेली साथ इंग्लंडसमोर दमदार आव्हान देण्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली. रोहितने विदेशातील पहिलेच कसोटी शतक ठोकले, तर पुजाराने अर्धशतकी योगदान दिले. ही कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यासह फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना आयसोलेट करण्यात आले आहे.

नागपूरच्या कन्हान नदीत
पाच तरुण बुडाले

नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे कन्हान नदीच्या काठावर असलेल्या “अम्माची दर्गा” या ठिकाणी पाच तरुण बुडाले आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे यवतमाळमधील दिग्रस तालुक्यातून सुमारे १० जण अम्माची दर्गा या ठिकाणी होत असलेल्या उर्समध्ये सहभागी होण्यासाठी आले होते..त्यापैकीच पाच जण आज सकाळी नदीत बुडाल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे सर्वजण सकाळी आंघोळ करायला नदीत उतरले.

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचा
दबाव, तालिबानचा भूमिकेवर यू-टर्न

तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे, मात्र अद्यापही तालिबानकडून सरकार स्थापनेचा निर्णय झालेला नाही. तालिबानच्या प्रवक्त्याकडून अनेकदा तारखा जाहीर करुन त्या पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे तालिबानमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं स्पष्ट होतंय. 15 ऑगस्टनंतर अनेकदा सरकार स्थापन करण्याबाबत तारीख जाहीर करण्यात आली आणि नंतर पुढे ढकलण्यात आलीय. सरकार स्थापनेत उशीर का होतोय असा प्रश्न उपस्थित होतोय. तालिबान संघटनेत अजूनही दुफळी आहे का? तालिबान-हक्कानी नेटवर्कच्या युतीत ताळमेळ नाहीये का? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.

पाप केलं की कोरोना
होतोच : संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली. पाप केलं की कोरोना होतोच, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत हे आज राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या खेडमध्ये आहेत. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.