राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाचे नियम नाहीत का? असा सवाल ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. इतकंच नाही तर शरद पवारांना अटक करा, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा सदावर्ते यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील मंचर येथे स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य आजी-माजी आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.
या गर्दीवरुन गुणरत्न सदावर्ते यांनी थेट शरद पवार यांना अटक करण्याची मागणी केली आहे. “शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी कोव्हिड नियम नाही का? राजकारणासाठी लोकांना एकत्र आणणे, लोकांना वेठीस धरणे हे भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 ला अभिप्रेत नाही. शरद पवार, दिलीप वळसे पाटील तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता मला तुम्हाला सांगायचं आहे, शरद पवार यांना अटक करा, नाहीतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करु आणि आम्ही तशी तक्रार केली आहे” असं सदावर्ते म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या भाषणात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. “महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्दैवाने आज संघर्ष दिसत आहे. एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय. मग वक्तव्य मागे घ्यावे लागत आहेत. दिलगिरी ही व्यक्त करण्याची वेळ येते. ही आजची महाराष्ट्रातील परिस्थिती आहे. किसनराव बाणखेले हे विरोधात असतानादेखील जे वागायचे, त्याची कमतरता दिसते”, असं म्हणत शरद पवारांनी राज्यातील नेत्यांना कानपिचक्या दिल्या.