२०२३-२४ या चालू आर्थिक वर्षांसाठी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा दर २० आधार बिंदूंनी कमी होऊन ५.९ टक्क्यांपर्यंत घसरेल, असा धोक्याचा इशारा देणारा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी वर्तविला. याआधी आयएमएफने विकासदर ६.१ टक्के राहण्याचे भाकीत केले होते. तथापि, खालावलेल्या या सुधारित अंदाजानंतरही भारतच जगातील सर्वाधिक वेगाने आर्थिक विकास साधणारा देश असेल, असे आयएमएफने स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन दर्शविणाऱ्या अहवालाने, जागतिक अर्थवृद्धीही २०२३ सालात २.९ टक्क्यांवरून, २.८ टक्क्यांवर येण्याचे सुधारित अनुमान पुढे आणले आहे, जे २०२२ मधील ३.४ टक्क्यांच्या तुलनेत तब्बल अर्धा टक्क्यांची घसरण दर्शविणारे आहे. भारताच्या दृष्टीने सरलेल्या आर्थिक वर्षांतील ६.८ टक्क्यांच्या तुलनेत विद्यमान आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्था वाढीचा दर ५.९ टक्के असेल. २०२४-२५ या आगामी आर्थिक वर्षांसाठीचा अंदाजही जानेवारीत वर्तवलेल्या ६.८ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांपर्यंत कमी केला गेला आहे.
भारतानंतर चीनचा विकासवेग सर्वाधिक राहिल, असे या अहवालाची आकडेवारी दर्शविते. चीनचा विकासदर २०२३ मध्ये ५.२ टक्के आणि २०२४ मध्ये ४.५ टक्के राहण्याचा अंदाज अहवालाने वर्तविला आहे. जो २०२२ मध्ये केवळ ३ टक्के नोंदवला गेला होता.
जागतिक पातळीवर करोनाची महासाथ आणि त्यानंतर युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणानंतर, महागाईला प्रतिबंध म्हणून व्याजदर वाढीमुळे आर्थिक अरिष्ट ओढवण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतून जागतिक पातळीवर उभारीच्या दिशेने मार्गक्रमण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच जागतिक अर्थवृद्धीला प्रभावित करणाऱ्या चीनच्या अर्थव्यवस्थेने जोरदार पुनरागमन केले आहे. पुरवठा-साखळीतील व्यत्यय कमी होत आहे, असे आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ पीएरे-ऑलिव्हियर गौरींचास यांनी सांगितले.