ढगाळ हवामान, वादळवारे आणि अवकाळी पावसामुळे सोलापूरचे तापमान ४० आंशावरून ३१ अंशांवर खाली आले होते. परंतु आता पुन्हा तापमानाचा पारा वाढून ४०.६ अंश सेल्सिअवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रचंड वाढलेला उष्मा असह्य झाला आहे. गेल्या आठवड्यात यंदाच्या उन्हाळ्यात सोलापूरचा तापमानाचा पारा प्रथमच चाळिशी ओलांडून पुढे गेला होता.
सलग दोन दिवस हीच स्थिती होती. सुदैवाने तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण, सोसाट्याचे वारे आणि अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे तापमान लक्षणीय स्वरूपात घटले. ४०.३ अंशांवरील थेट ३१ अंशांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला खरा; परंतु नंतर तापमानाचा पारा पुन्हा वाढत गेला. मंगळवारी तापमान पुन्हा ४०.६ अंश सेल्सिअसवर गेले. सकाळपासूनच उकाडा जाणवत असून दुपारी रस्त्यावरील वर्दळ रोडावलेली दिसून आली.