केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाप्रमाणं राज्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लसीचा डोस दिला जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. मात्र, चिपळूण तालुक्यातील फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रात एका 15 वर्षीय मुलाला लसीचा डबल डोस दिल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. संबंधित मुलाला कामथे उप जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
दोन दिवसांपूर्वी शहरात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी शहरातील 380 जणांना लस देण्यात आली. मात्र आता ग्रामीण भागात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अशातच तालुक्यातील फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रात एका 15 वर्षीय मुलाला एकाचवेळी दोन डोस दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार घडला.
तुर्तास या मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. मात्र तरीही त्याला कामथे उप जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी दिली. मुळात डोस देताना नोंदणी केली जाते. तसेच टोकनही दिले जातात तरीही हा प्रकार घडला कसा, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील शाळा आजपासून बंद होत आहेत. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंदचे आदेश दिले आहेत. पहिलीपासून ते बारावीपर्यतचे वर्ग बंद राहणार आहेत. रत्नागिरीमध्ये आता ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन पाटील यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 82 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालीय. 24 तासात 1 हजार 139 अहवालांमध्ये तब्बल 82 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत 231 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात 24 तासात 8 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.