अनाथांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करून त्यांना केवळ निवारा आणि शिक्षणच नाही तर मायेची सावली देणाऱ्या सिंधुताई सपकाळ या आता आपल्यात राहिल्या नाहीत. त्यांच्या निधनामुळे देशाच्या सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनामुळे तर अनाथांवर जणू डोंगरच कोसळला आहे. त्यांचे भावविश्वच हरपून गेलं आहे. सिंधुताई यांच्या नंतर अनाथांची माय कोण? असा सवाल केला जात आहे. तर दुसरीकडे सिंधुताईंच्या कन्या ममता सपकाळ या सिंधुताईंचा वारसा पुढे नेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
सिंधुताईंनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी ‘ममता बाल सदन’ नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनाथांसाठी भरीव असं काम केलं. त्यामुळे अनाथांची माय ही त्यांची ओळख निर्माण झाली. या एका संस्थेच्या उभारणीनंतर त्यांनी आणखी सहा संस्था स्थापन केल्या. त्यामुळे उत्तराधिकारी म्हणून ममता सपकाळ याच या सर्व संस्थांची देखभाल करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
बाल निकेतन हडपसर, पुणे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
अभिमान बाल भवन, वर्धा
गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
ममता बाल सदन, सासवड
सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे
सिंधुताई यांनी एकूण सहा संस्था स्थापन केल्या. त्यांनी स्थापन केलेल्या आश्रमात 1400 मुलं राहतात. त्यांच्या कुंभारवळणमधील आश्रमात 50 मुली व 65 मुले राहतात. शिरूर येथील आश्रमात 48 मुले आहेत. तर, चिखलदरा येथे 78 मुले राहतात. ही सर्व अनाथ मुले आहेत. त्या एक हजाराहून अधिक मुलांच्या आजी आहेत. त्यांना 207 जावई आणि 36 सूना आहेत.
सिंधुताई आजारी असताना ममता सपकाळ यांचं त्यांच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. त्यावेळीही सिंधुताईंना अनाथ लेकरांची काळजी होती. त्या मुलांची काळजी घ्या असं त्या ममता यांना सांगत होत्या. मुलांची काळजी घ्या. शाळा सुरु झाल्या की नाही?, मुले शाळेत जातात का?, अशी चौकशी त्यांनी केली होती, असं ममता यांनी सांगितलं.
अनाथ मुलांना आधार देण्याचं मोठं कार्य सिंधुताई सपकाळ यांनी आयुष्यभर केलं. आता हे काम पुढेही असंच चालू राहणार असं ममता यांनी स्पष्ट करून सिंधुताईचा वसा पुढे नेण्याचा निर्धार बोलू दाखवला. त्यामुळे ममता याच सिंधुताईच्या उत्तराधिकारी असल्याचं अधोरेखित झालं आहे. ‘ तिचं सगळं काम जे.. ज्या पद्धतीने सुरु होतं, तसंच पुढे सुरू राहिल. तिने आम्हाला वाढवलं. तसंच, त्या पद्धतीतून हे कार्य अव्याहत सुरु राहील. त्या प्रत्येक गोष्टीतून ती आमच्यात जिवंत आहे, असं ममता म्हणाल्या