मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी
जोरदार तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान वेगवेगळ्या मंत्र्यांना गटाने बोलावून त्यांच्या कामाचा आढावा घेत आहेत. या बैठकीदरम्यान गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा सुद्धा उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येत आहे. आतापर्यंत तीन मंत्र्यांच्या समुहांच्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी रामेश्वर तेली, व्ही. के. सिंह यांच्यासह इतर मंत्र्यांच्या कामाची माहिती घेतली.
कुस्तीपटू विनेश फोगटची
सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक!
भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने शानदार प्रदर्शन करत भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्णपदक ठेवले आहे. पोलंड ओपनमध्ये ५३ किलो वजनी गटात झालेल्या सामन्यात विनेशने विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णपदकामुळे तिची टोकियो ऑलिम्पिकची तयारी योग्य दिशेने चालली आहे, हे दिसून येते. २६ वर्षीय विनेशचे हे हंगामातील तिसरे विजेतेपद आहे. मार्चमध्ये मॅटिओ पेलिकोन आणि एप्रिलमध्ये आशियाई स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले. या विजयामुळे विनेश टोकियो ऑलिम्पिकमधील अव्वल मानांकित कुस्तीपटू होण्याची शक्यता आहे.
सोपोर दहशतवादी हल्ला
दोन जवान शहीद
काश्मीरमधील सोपोर येथील अरमपोरा नाका येथे आज दहशतवादी हल्ला झाला आहे. या घटनेत दोन जवान शहीद झाले असून, दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अन्य दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. लष्कर ए तोयबाने हा दहशतवादी हल्ला घडवला असल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली आहे.
एकविरा देवी, राजगड किल्ल्यावर
जाण्यासाठी रोप वे तयार करणार
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवी मंदिरात आणि राजगड किल्ल्यावर जाण्याऱ्या भक्तासांठी आता पायी जावं लागणार नाही. लोणावळ्याजवळील कार्ला येथील श्री एकविरा देवी मंदिरात आणि पुण्यातील राजगड किल्ल्यावर फ्युनिक्युलर रेल्वे किंवा रोप वे तयार करण्यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि इंडियन पोर्ट रेल आणि रोप वे कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) यांनी शुक्रवारी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता काही मिनिटांमध्ये भाविकांना येथे जाता येणार आहे.
चंद्रकांत कागले यांचे
हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत मागील ४० वर्षे संगीतकार, गायक, उत्कृष्ट तबलावादक आणि अभिनय अशा विविध स्तरांवर ठसा उमटवलेले कोल्हापुरमधील चंद्रकांत कागले(वय-५६) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना नातवंडे असा परिवार आहे.
कोरोना विषाणूचा जेनेटिक सिक्वेन्स
मानवनिर्मित असल्याची शंका
कोरोना विषाणूचा लोकांमध्ये वेगाने प्रसार होण्यास अनुरूप तयार करण्यात आल्याची शक्यता असल्याचे नेचरमध्ये प्रकाशित एका शोधनिबंधात म्हटले आहे.
अहवालानुसार, कोविड विषाणूमध्ये अनेक असामान्य गुण आहेत. त्यामध्ये जेनेटिक सिक्वेन्स सिग्नलिंगचे एक फिचर असे आहे ज्यावर तो मानवनिर्मित असल्याची शंका उपस्थित होते. त्यात पेशींमधील प्रोटिनलाही सूचना केली जाऊ शकते. अशा प्रकारच्या विषाणूमध्ये आढळणार्या प्रोटिनमध्ये सिक्वेन्स सिग्नल नसतात.
म्यानमारमध्ये अमानुषपणाचा कळस
रस्त्यांवरच दारूगोळा, सुरुंग पेरले
म्यानमार मधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याटे दिसून येत आहे. म्यानमारमधील लष्कराने नागरिकांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आता अमानुषपणाचा कळस गाठला आहे. यासाठीच लष्कराने थेट रस्त्यांवरच दारूगोळा आणि सुरुंग पेरले आहेत. ही बाब कळताच जीव वाचवण्यासाठी हजारो नागरिक सैरभैर धावत आहेत. याबद्दल संयुक्त राष्ट्राने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
१८ वर्षीय मुलीला पुलित्झर
पुरस्कार, शौर्याबद्दल गौरव
अन्याय अत्याचाराच्या घटना जगभरात घडत असतात. तसेच या घटनांची छायाचित्रे देखील समाज माध्यमात अशीच एक घटना मे २०२० मध्ये अमेरिकेतील मिनियापोलिस शहरात घडली होती. एका पोलिस अधिकाऱ्याने निर्दयपणे एका कृष्णवर्णीय म्हणजेच निग्रो व्यक्तीला अमानुषपणे मारहाण करीत त्याला ठार मारले होते. या घटनेचा व्हिडीओ माध्यमात प्रसिद्ध झाल्यावर जगभरातून अमेरिकन गोऱ्या पोलिसाच्या दुष्कृत्यांबद्दल तीव्र संतापाची लाट उमटली होती. हा व्हिडीओ तयार करणाऱ्या १८ वर्षीय मुलीला पुलित्झर पुरस्कार देऊन तिच्या शौर्याबद्दल गौरव करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीहून हात
हलवत आले, त्यांच्या मनात पाप : मेटे
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले की, “मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयाने रद्द करून, जवळपास महिना होऊन गेला, तरी देखील सरकार न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करू शकलेले नाही. यामधून सरकारची मानसिकता दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही ५ जून रोजी बीड येथे भव्य मोर्चा काढला. या सर्व घडामोडी घडत असताना. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील अन्य मंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भेट घेतली. त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले नाही. तेथून हात हलवत आले असून, त्यांच्या मनात पाप आहे,” असं म्हणत विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
कोपर्डीमधील निर्भयाला
लवकर न्याय मिळायला हवा
छत्रपती संभाजीराजे यांनी आज कोपर्डी येथे जाऊन सामुहिक बलात्काराच्या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कोपर्डीमधील निर्भयाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. सहा महिन्यात हे सर्व प्रकरण निकाली लागायला हवं. अशी मागणी संभीजाराजेंनी पत्रकारपरिषदेत केली आहे.
हॉलमार्किंग १६ जूनपासून
सुरू करण्याचा निर्णय
केंद्र सरकारने सोन्याचे दागिणे आणि कलाकृतीं हॉलमार्किंग १६ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था अनिवार्य करण्यासाठी पूर्वी १५ जानेवारीचा मुहूर्त निघाला होता. मात्र आता एक दिवस आणखी वाढवला आहे. याचाच अर्थ आता दागिण्यांच्या व्यापाऱ्यांना १५ जूननंतर १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दागिणेच विकण्याची परवानगी असेल.
ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्सची
सुधारित कमाल किंमत सादर
राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरण (एनपीपीए) च्या दिनांक ३ जून २०२१ च्या अधिसूचनेनुसार ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्ससाठी वितरकांच्या किमतीवर (पीटीडी) ट्रेड मार्जिन मर्यादा ७० टक्के ठेवण्यात आली आहे. त्यानुसार ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्सच्या एकूण १०४ उत्पादक / आयातदारांनी २५२उत्पादने / ब्रँडसाठी सुधारित कमाल किरकोळ किंमत सादर केली आहे.
मुंबई परिसराला असलेला
अतिवृष्टीचा धोका टळला
रायगड आणि नवी मुंबई परिसराला असलेला अतिवृष्टीचा धोका टळला आहे. कारण, पनवेल आणि नवी मुंबई परिसरात रिमझिम पाऊस बरसत आहे. तर रायगडमध्येही तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 34 मिमी इतका पाऊस झाला आहे. तर पनवेलमध्ये 29.30 मिमी आणि नवी मुंबईत पावसाची सरासरी 45 मिमी इतकी आहे.
चीनची सायबर आर्मी भारतात
मोबाईल डेटा चोरणार
चीनने पुन्हा एकदा भारताला लक्ष्य केलं आहे. भारतात चीनी नागरिकांनी एक सायबर आर्मी तयार केली आहे. जी भारतीय नागरिकांच्या थेट घरात प्रवेश करणार आहे. ही सायबर आर्मी मोबाइल डाटा चोरणार आहे. एवढंच नव्हे तर मेहनतीने कमावलेल्या रक्कमेवरही चीन आर्मीचा डोळा आहे. यामुळे आता प्रत्येक भारतीय नागरिकाने सावधान राहणं गरजेचं आहे. कोरोना व्हायरस चीनकडून मिळाल्याचं समजलं जातं. भारतासह जगभरात कोरोना व्हायरसचा धोका निर्माण झाला.
राज्यातले 21 जिल्हे
सोमवारपासून निर्बंधमुक्त
लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता येत आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू हटविण्यात येत आहेत. राज्यातले 21 जिल्हे सोमवारपासून निर्बंधमुक्त होत आहेत. पण रुग्णसंख्या अधिक असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमधील निर्बंध रद्द झाले होते. आता ही संख्या 21 झाली आहे.
ड्रायव्हिंग लायसन्सच्या
चाचणीमध्ये सूट देण्यात येणार
वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. पुढच्या महिन्यापासून ड्रायव्हिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. या नव्या नियमामध्ये ड्रायव्हिंग लायसन्सच्या चाचणीमध्ये सूट देण्यात येणार आहे. वास्तविक, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स नियमांना अधिसूचित केले. हे नियम 1 जुलै 2021 पासून लागू होतील. सध्या रिजनल ट्रांसपोर्ट ऑफिस (RTO) द्वारे ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते. परंतु जर त्यांनी अशा मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांकडून प्रशिक्षण घेतले, तर वाहन चालकांना वाहन चालविण्याचा परवाना मिळण्यास मदत होईल.
कुलभूषण जाधव प्रकरणात
पाकिस्तानची माघार
कुलभूषण जाधव प्रकरणात अखेर पाकिस्तानला झुकावंच लागलं. ANI ने दिलेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 2020 मध्ये काढलेल्या अध्यादेशाला मान्यता मिळाली आहे. यानंतर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दिलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी मिळाली आहे.
SD social media
9850 60 3590