भुजबळांच्या नातींचा इंग्लंडमध्ये डंका, देशाला मिळवून दिले 2 गोल्ड
इंग्लंड येथील केंट शहरात झालेल्या इंटरनॅशनल फिल्ड असोसिएशनद्वारे आयोजित ‘वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप 2023’ या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या दोन्ही नाती देविशा व तनिष्का पंकज भुजबळ यांनी सुवर्ण कामगिरी केली. त्यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. देविशा आणि तनिष्का या माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या कन्या आहेत. त्यांनी चमकदार कामगिरी करीत भारतासाठी सुवर्ण पदक मिळविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
उद्धव ठाकरेंना आता पक्षनिधीही जाण्याची भीती! सुप्रीम कोर्टात काय झालं?
आधी मुख्यमंत्रीपद गेलं, मग सरकार कोसळलं, आमदार-खासदार सोडून गेले आता तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हही उद्धव ठाकरेंच्या हातातून गेलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना द्यायचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
सगळं काही हातातून गेल्यानंतर आता ठाकरे गटाला पक्षनिधीही जायची भीती आहे. ठाकरे गटाची बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात हाच युक्तीवाद मांडला आहे. त्यांनी आधीच विधिमंडळातलं पक्ष कार्यालय ताब्यात घेतलं आहे, आता ते बँक अकाऊंट आणि सगळं ताब्यात घेतील, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली.
आश्चर्य! माकडाच्या अंत्ययात्रेला अख्ख गाव, टाळमृदंगाच्या गजरात अंत्यविधी
एखाद्या माणसाच्या अंत्ययात्रेलाही होणार नाही एवढी गर्दी चक्क वानराच्या अंत्ययात्रेला गर्दी जमली होती. ही घटना लातूर जिल्ह्यातल्या बुधोडा येथे झाली होती. ग्रामस्थांनी टाळमृदंगाच्या गजरात वानराचा अंत्यविधी केला.
औसा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील बुधोडा येथे काल (दि.21) सोमवारी सायंकाळी ट्रकच्या धडकेने वानराचा दुर्दैवी अंत झाल्याने ग्रामस्थांनी त्याची टाळमृदंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढली अन मारुती मंदीराशेजारी त्याचा विधिवत अंत्यविधी केला.वानर हे हनुमंताच्या कुळातील मानण्याची परंपरा असल्याने बुधोडा येथील ग्रामस्थांनी त्या मृत वानराची टाळमृदंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढली.
स्मृती मानधनाने अर्धशतक झळकावत केले अनेक विक्रम
भारताची महिला क्रिकेटर स्मृती मानधना सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयसीसी महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये तिने आणखी एक अर्धशतक झळकावलं आहे. मानधनाने सोमवारी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 56 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 87 धावा केल्या. स्मृती मानधनाने या खेळीसह अनेक विक्रमही केले.
सलामीला खेळताना आंतरराष्ट्रीय महिला टी20 सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा एका डावात करण्याची कामगिरी स्मृती मानधनाच्या नावावर नोंद झाली. याआधी तिच्याच नावावर हा विक्रम होता. 2019 मध्ये तिने न्यूझीलंडविरुद्ध 86 आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 83 धावांची खेळी केली होती.
बारावीच्या परीक्षेला प्रारंभ, निकालावर मात्र संकट! उत्तरपत्रिका मूल्यांकनावर शिक्षकांचा बहिष्कार
राज्यातील शिक्षण आणि शिक्षकांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. बारावीच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका मूल्यांकनावर विज्युक्टा व महासंघाने बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ. अविनाश बोर्डे यांनी दिली. त्याचा विपरीत परिणाम निकालावर पडण्याची दाट शक्यता आहे.
शिक्षण क्षेत्र व शिक्षकांचे प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. वारंवार शासनाला निवेदन देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी ५ सप्टेंबर शिक्षक दिनापासून वेगवेगळ्या टप्प्यावर तालुका व जिल्हा स्तरावर विविध आंदोलने करण्यात आली. मागण्यांकडे सातत्याने डोळेझाक केल्यामुळे बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनावर विज्युक्टा व महासंघाने बहिष्कार टाकला. पुणे येथे आज इंग्रजी विषयाची ‘चीफ मॉडरेटर’ची बैठक उधळून लावण्यात आली. यापुढे आंदोलन तीव्र करण्याची संघटनेने भूमिका असल्याचे डॉ. बोर्डे यांनी सांगितले.
१२ वी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांच्या चुका; प्रश्नांऐवजी छापून आली चक्क ‘मॉडेल आन्सर’
आज इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. दरवर्षी आढळून येणाऱ्या या चुकांमुळे इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत गोंधळ होणे हे नित्याचेच झाले असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
फेब्रुवारी २०२३ यावर्षीच्या बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून पहिला पेपर इंग्रजी भाषेचा होता. इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या प्रश्नपत्रिकेत a-३,a-४, a-५ या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले. काही विद्यार्थ्यांनी तर गोंधळून प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने तयार केलेल्या ‘मॉडेल आन्सर’ मधील a-३, a-४, a-५ ही उत्तरे सूचनासह जशीच्या तशीच कृतिपत्रिकेत छापून आली आहेत.
युक्रेन-रशिया युद्ध सुरु असताना खालावली व्लादिमिर पुतिन यांची प्रकृती
मागच्या वर्षी सुरु झालेल्या युक्रेन विरुद्ध रशिया युद्धाला काल (२० फेब्रुवारी) एक वर्ष पूर्ण झाले. या युद्धाची घोषणा केल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन खूप चर्चेत आले होते. या निर्णयामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. युद्ध सुरु केल्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झाला होता. अशा कठीण परिस्थितीमध्येही पुतिन खंबीरपणे देशाचे नेतृत्त्व करत होते. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली होती. आज युद्धाच्या वर्षपूर्ती निमित्त ते रशियाला संबोधणार आहेत. त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला जाणार आहे अशी शक्यता वर्तवली जात होती.
राज्यसभेत गोंधळ घालणं पडलं महागात; १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस
राज्यसभेच्या १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आदेशानुसार ही नोटीस बजावली आहे. वारंवार आपली जागा सोडून घोषणाबाजी करणे, सदनाच्या कामकाजात अडथळे आणल्याप्रकरणी ही नोटीस बजावत चौकशी करण्याचे आदेश राज्यसभा संसदीय समितीला दिले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि आपच्या खासदारांचा समावेश आहे.
राज्यसभेच्या संसदीय समितीने काढलेल्या आदेशात सांगितलं की, “अध्यक्षांनी खासदारांच्या गैरवर्तनामुळे हक्कभंग झाला आहे. सतत संसदेच्या हौद्यात उतरुन घोषणाबाजी करणे, कामकाजात अडथळा आणल्यामुळे अध्यक्षांना संसद स्थगित करावी लागली,” असेही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
SD Social Media
9850 60 3590