एसटी कामगारांच्या संपावरून शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणे तूर्तास शक्य नाही हे विरोधी पक्षालाही पक्के माहीत आहे. कामगारांनीही हे सत्य स्वीकारले आहे, पण भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी झाली. 12 आमदारांच्या मंजुरीची फाईल ज्या प्रकारे भाजपने तुंबवून ठेवली त्याच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांचा संपही अडकवून ठेवला आहे. दहशत , ब्लॅकमेल व वैफल्याचे हे राजकारण आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेने केली आहे.
शिवसेनेने दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून ही घणाघाती टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर चर्चा वगैरे होऊन इतरही प्रश्न भविष्यात मार्गी लागतील. तरीही भारतीय जनता पक्षातले लोक संपास चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
साताऱ्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास हिंसक वळण लागले. सातारा आगारातून एस.टी. बस बाहेर काढणाऱ्या चालकांना भाजप समर्थकांनी हाणामारी केली. अशा घटना आता अन्य ठिकाणी घडू लागल्या आहेत. हे भाजपचे वैफल्य म्हणायला हवे. मुंबईतील आझाद मैदानावर एस.टी. कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्या ठिय्या आंदोलनात भाजपचे नेते घुसतात व शेवटपर्यंत लढण्याच्या गर्जना करून आपापल्या घरी आरामात झोपतात. कर्मचारी मात्र तेथे मच्छर, दगडधोंड्यांच्या सहवासात बसून आहेत. त्या ठिय्या आंदोलनात भाजपनेही सात-आठ दिवस पथारी पसरलीय असे दिसत नाही. म्हणजे ‘लडने को तुम और भाषण को हम’ असेच त्यांचे चालले आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला आहे.