आज दि.२६ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

PFI च्या निशाण्यावर RSS आणि BJP चे मोठे नेते, संघ मुख्यालयदेखील रडारवर

PFI बाबत मोठी बातमी समोर आली आहे. PFI च्या रडारवर RSS आणि BJP चे अनेक मोठे नेते असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र ATS सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे PFI च्या निशाण्यावर नागपुरचा संघ मुख्यालयदेखील आहे.PFI देशातील मोठे RSS आणि BJP नेत्यांवर हल्ला करण्याचा प्लान आखत होते, अशीही माहिती सांगितली जात आहे. PFI च्या सदस्यांनी RSS ची दसऱ्याच्या दिवशी होणारी पथ संचालनाची माहिती जमा केली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय एजन्सी NIA , CRPF आणि राज्य ATS ने संपूर्ण देशात 10 राज्यांमध्ये PFI शी संबंधित लोकांवर छापेमारी करीत शेकडो लोकांना अटक केली होती.

ऑस्ट्रेलियाला हरवून टीम इंडिया रॅन्किंगमध्ये आणखी स्ट्राँग

टीम इंडियानं हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून टी20 मालिका विजय साजरा केला. टीम इंडियासाठी ही मालिका खास ठरली. कारण मोहालीतला पहिला सामना हरल्यानंतर भारतीय संघानं जोरदार कमबॅक करत नागपूर आणि हैदराबादमध्ये बाजी मारली. भारतानं गेल्या 9 वर्षात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला मायदेशातल्या टी20 मालिकेत हरवण्याचा पराक्रम गाजवला. तिसऱ्या टी20त सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं दिलेलं 187 रन्सचं लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स राखून पार केलं. आणि याच विजयानंतर टीम इंडियाचं आयसीसी रॅन्किंगमधलं अव्वल स्थान आणखी मजबूत झालं आहे.

एकीकरणाचा संदेश देत 310 गावात ‘एक गाव, एक दुर्गादेवी’ 

शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून सुरू झाला आहे. दोन वर्ष कोरोनाचे निर्बंध असल्यानं उत्सवावर देखील निर्बंध होते. आता निर्बंध हटल्यानं उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. वर्धा जिल्ह्यात नवरात्र उत्सवाला एक वेगळेच महत्त्व असते. यावेळी उत्सव काळात बंधुभाव वाढावा, या उद्देशाने प्रशासनाकडून एक गाव, एक दुर्गा देवीची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 310 गावात एक गाव दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली आहे. 

बाळासाहेबांच्या ‘सावली’नेही सोडली उद्धव ठाकरेंची साथ, चंपासिंग थापा शिंदे गटात

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक धक्का दिला आहे. बाळसाहेब ठाकरेंची सावली म्हणून ज्याची ओळख होती, त्या चंपासिंग थापाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाण्यामध्ये चंपासिंग थापाचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. चंपासिंग थापा हे कित्येक वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून काम पाहत होते.चंपासिंग थापासोबतच बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक निकटवर्तीय मोरेश्वर राजे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेवून पुढे जात आहात, म्हणून थापा माझ्या सोबत आलेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

सर्वांच्या डोळ्यांसमोर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली

अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटल्याची घटना समोर आली आहे. ग्रीन सिटी कॅम्पसमध्ये ही घटना घडली. स्कूल बस उलटल्याचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सुदैवाने एकही विद्यार्थी गंभीर जखमी झाला नाही. तर याप्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक खाजगी मिनी स्कूल बस आज सकाळच्या सुमारास उलटली. या बसमध्ये सुमारे 17 ते 18 विद्यार्थी होते. बस उलटल्यानंतर स्थानिकांनी बसमध्ये चढून विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढले. या अपघातात दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी शाळा प्रशासनाने सांगितले की, ही स्कूल बस नसून खासगी बस आहे. या बसच्या माध्यमातून मुलांना शाळेत आणले जात होते. बस उलटल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

आमदारकी गेली, ग्रामपंचायत गेली आता साखर कारखानाही गेला, भाजपच्या मोठ्या नेत्याचा दारूण पराभव

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या 28 वर्षांपासून असलेल्या सत्तेला सुरुंग लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पिचड यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. माजी आमदार वैभव पिचड यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे निर्वादितपणे 28 वर्षांपासून असलेल्या सत्तेपासून दूर व्हावे लागले आहे.अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये पिचडांना मोठा धक्का बसला आहे. साखर कारखान्यातील 28 वर्षांपासूनची सत्ता गेली आहे. आमदारकी, ग्रामपंचायत आणि आता कारखाना निवडणुकीतही मधुकरराव पिचड गटाचा पराभव झाला आहे.

अखेर गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाचं नाव जाहीर

काँग्रेसचे माजी नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी अखेर सोमवारी त्यांच्या नव्या पक्षाच्या नावाची घोषणा केली. त्यांनी आपल्या पक्षाचे नाव डेमोक्रॅटिक आझाद पार्टी असे ठेवले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत काँग्रेस पक्षाला गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर गुलाम नबी आझाद यांनी स्वबळावर नवा पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या नव्या पक्षाच्या नावाबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. अखेर त्यांनी आपल्या नवीन पक्षाचे नाव जाहीर केले आहे.

दसरा मेळाव्यावरून शिंदे गट मवाळ, सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल नाही!

मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. पण, अजून सर्वोच्च न्यायालयात याचिकाच दाखल करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.शिवाजी पार्कबाबत शिंदे गटाने अजून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. हायकोर्टाची ऑर्डर वकिलांना न मिळाल्याने याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात आज याचिका दाखल होण्याची शक्यता कमी आहे. हायकोर्टाच्या ऑर्डरमधील त्रुटी पाहूनच याचिका दाखल केली जाणार, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचाही दणका, बंगल्यावर हातोडा चालवण्याचे BMC ला आदेश

मुंबईतील अधिश बंगला अवैध बांधकाम प्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही दणका दिला आहे. बंगल्याबाबत याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. 3 महिन्यात बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहे.नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं Adhish नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या. या प्रकरणी मुंबई कोर्टाने याचिका फेटाळून लावली होती. तसंच अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत 10 लाखांचा दंड ठोठावला असून मुंबई महापालिकेला कारवाई करण्यास परवानगीही दिली आहे. या निर्णयाविरोधात नारायण राणेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली असून हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे.

राजू श्रीवास्त यांच्या प्रार्थना सभेत हसून पोज दिल्याने जॉनी लीवर ट्रोल

सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे  21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.20 वाजता निधन झाले. तब्बल 42 दिवस मृत्यूशी झुंज देत होते राजू श्रीवास्तव अखेर ही लढाई हरले. त्यांच्या जाण्यानं सगळीकडे मोठी शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव यांच्यासाठी रविवारी संध्याकाळी मुंबईत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये त्याच्या चाहत्यांची आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी पहायला मिळाली होती. यावेळी कॉमेडियन जॉनी लीवरनेही हजेरी लावलेली पहायला मिळाली. मात्र त्यांच्या समोर आलेल्या व्हिडीओमुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.यावेळीचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जॉनी हसताना दिसत आहे. याशिवाय ते पोजही देताना दिसले. त्यांचं हसू पाहून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी वेळेचं काही गांभीर्य आहे की नाही, अशा कमेंट करत जॉनी लीवरला प्रश्न केला आहे.

माकडाचा पोलीस ठाण्यात हल्ला, महिलेपासून बाळ हिसकावण्याचा प्रयत्न 

ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिळ डायघर पोलीस ठाण्यात माकडाने चक्क मुलाला आईच्या कुशीत हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत बालक जखमी झाले आहे. शिळ डायघर पोलीस ठाण्यात एका महिलेची तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. याच वेळी हा भयानक प्रकार घडला.

पोलीस ठाण्यात ही महिला असता याचवेळी एका माकडाने येऊन महिलेच्या कुशीतील 1 महिन्याचे बाळ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र, यादरम्यान महिलेने बाळाला पकडले, यामुळे माकड मुलाला हिसकावून घेऊ शकले नाही. मात्र, मूल जखमी झाले आहे.

यानंतर कसेबसे पोलीस कर्मचारी व इतरांनी माकडाला हुसकावून लावले. तसेच यानंतर जखमी बालकाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. यासोबतच शिळ डायघर पोलिसांनी वनविभागाला याची माहिती दिली. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून या माकडाला आपल्या सोबत नेले.

तलावात ट्रॅक्टर उलटल्याने दहा जणांचा मृत्यू ; ३७ जण जखमी

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या ग्रामीण भागात एक भीषण दुर्घटना घडली आहे. सीतापूरहून उनाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह तलावात उलटून १० जणांचा मृत्यू झाला. तर ३७ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तलावातून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शशी थरूरांचे ठरले, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

सध्या काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. ते अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरत असल्याने त्यांना राजस्थानचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागणार आहे, यामुळे राजस्थानमध्ये संत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. एकीकडे राजस्थानमध्ये राजकीय उलथापालथ सुरू असताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. आपल्याला देशातील बहुतेक राज्यांचा पाठिंबा असल्याचंही थरूर यांनी म्हटलं आहे.

बीसीसीआयला लवकरच मिळणार नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयने निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. निवडणुकीसोबतच वार्षिक सर्वसाधारण सभेचेही आयोजन करण्यात येणार आहे. बीसीसीआय १८ ऑक्टोबरला निवडणूक घेणार आहे. हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह सर्व पदांसाठी असेल. सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. तर जय शहा हे सचिवपदावर आहेत. या दोघांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. आता गांगुली आणि शाह आणखी एका कार्यकाळासाठी निवडणूक लढवू शकतात.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.