ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये तब्बल 49 वर्षांनी भारतीय पुरुषांच्या हॉकी टीमनं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पुरुषांच्या टीमपासून प्रेरणा घेत भारतीय महिला टीमनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव केला आहे. ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला हॉकी टीमनं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं इतिहास रचला आहे. फर्स्ट हाफमध्ये आघाडी भारतीय टीमला या मॅचच्या सुरुवातीलाच धक्का बसला. पहिल्या क्वार्टरमध्ये शर्मिला जखमी झाली. या दुखापतीनंतरही भारतानं झुंजार खेळ केला.
ऑस्ट्रेलियन टीमच्या चांगल्या चाली आपल्या टीमनं उधळल्या. त्यामुळे पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही टीमला एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय टीमनं वर्चस्व गाजवलं. गुरुजीत कौरनं 22 मिनिटाला गोल करत भारतीय टीमला आघाडी मिळवून दिली.
विशेष म्हणजे गुरुजीतनं टीमला मिळालेल्या पहिल्याच पेनल्टी कॉर्नवर गोल केला. गुरुजीतचा हा ऑलिम्पिकमधील पहिलाच गोल आहे. या गोलमुळे भारतानं पहिल्या हाफमध्ये 1-0 नं आघाडी घेतली. भारतीय टीमनं तिसऱ्या क्वार्टरमध्ये भक्कम बचावावर भर दिला.
सविता पुनियाच्या दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्वार्टरमध्येही यश मिळाले नाही. वर्ल्ड रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया नंबर दोन वर आहे. ऑस्ट्रेलिया टीममध्ये अनुभवी आणि तरुण खेळाडूंचं चांगलं मिश्रण आहे. त्यांनी गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले.
पण ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करण्यात यश मिळाले नाही. चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाचे दोन पेनल्टी कॉर्नर भारतीय टीमनं निष्फळ ठरवले. ऑस्ट्रेलियानं शेवटच्या मिनिटापर्यंत गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले. ऑस्ट्रेलियाला मॅच संपण्यास तीन मिनिटे कमी असताना आणखी पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारतीय बचाव फळीनं ते गोल देखील अडवले.