शेतजमिनीच्या उताऱ्य़ांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्य़ांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्य़ांना पीक कर्जही दिले जाते. मात्र, दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही. यासाठी महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्य़ांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र मोबाईल ऍपची निर्मिती केली आहे.
महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ऍपची निर्मिती केली आहे.
या मोबाईल ऍपमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती ऍपमध्ये संकलित होणार आहे. तसेच, ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्य़ांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्य़ांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल. ई- पीकपाहणीमुळे राज्यातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे.
ई-पीक नोंदणी प्रकल्प यापूर्वी प्रायोगिक तत्वावर वीस तालुक्यात राबवण्यात आला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर हा राज्यभर राबविण्याचा निर्णय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे. आज त्यासंदर्भाने राज्य सरकारने शासन आदेश जारी केला. शिवाय ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय पूर्ण वेळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आला आहे.