एटीएममधून पैसे काढणे
पूर्वीपेक्षा आणखी महाग होणार
१ जानेवारी २०२२ पासून एटीएममधून पैसे काढणे पूर्वीपेक्षा आणखी महाग होईल. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, १ जानेवारीपासून अतिरिक्त एटीएम व्यवहारांना २१ रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागेल. वास्तविक आरबीआयच्या नियमांनुसार बँक एका महिन्यात ५ एटीएम व्यवहारांसाठी आपल्या ग्राहकांकडून कोणतीही फी आकारू शकत नाही. या व्यतिरिक्त व्यवहारासाठी २० रुपये फी भरावी लागते. इतर बँकांचे एटीएम वापरणाऱ्या लोकांना मेट्रो शहरांमध्ये मोफत व मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.
करोनाबाधित कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आदेश
करोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल, असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमधील पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितलं आहे. तसेच, यावेळी त्यांनी आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत देणं सुरू झालंय, कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात प्रशासनाल यश आलं आहे. काही वस्त्यांचं पुनर्वसन आवश्यक, नागरिकांनी यामध्ये सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. निसर्गासमोर आपण हतबल आहोत. असं देखील सांगितलं.
गृहमंत्री अनिल देशमुख यांना
अटक होण्याची दाट शक्यता
हॉटेल व बारमालकांकडून शंभर कोटींची वसुली करण्याचे पोलिस अधिकाऱ्यांना आदेश दिल्याचा आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी आज मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. गेल्यावेळी देशमुख हजर झाले नव्हते. त्यांनी वेळ मागितला होता. आता पुन्हा समन्स बजावल्याने ते हजर होणार की त्यांना अटक होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
अदानींच्या नामफलकाची
शिवसैनिकांनी केली तोडफोड
मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला शिवसेनेने विरोध केला असून तोडफोड केली आहे. शिवसैनिकांनी विमानतळाबाहेर लावलेल्या नामफलकाची तोडफोड करत तिथून हटवला आहे. जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असे नामफलक लावले होते. त्याला शिवसैनिकांनी कडाडून विरोध केला असून नामफलकाची तोडफोड करण्यात आली. या ठिकाणी सध्या मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
कसोटी मालिकेला
४ ऑगस्टपासून सुरुवात
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज मैदानात खेळला जाणार आहे. आयसीसी क्रमावारीत भारतीय संघ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
ई-रुपी लाँच करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी ई-रुपी लाँच करणार आहेत. ई-रुपी हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाउचर आहे. पंतप्रधान मोदी नेहमीच डिजिटल उपक्रमांचा वापर करण्याबाबत माहिती देत असतात. तर, लाभार्थ्यांपर्यंत सर्व फायदे लीक-प्रूफ पद्धतीने नेण्यासाठी आतापर्यंत अनेक कार्यक्रम देखील सुरू केले गेले आहेत. ‘ई-रुपी’ हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे.
संजय राऊतांना शिवसेना भवनात
नेऊन फटके देऊ : निलेश राणे
निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊतांना शिवसेना भवनात नेऊन फटके देऊ असा इशारा दिला आहे. “हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत,” असे निलेश यांनी म्हटले आहे.
पण जाताना कदाचित खांद्यावरच
जावं लागेल : संजय राऊत
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. त्यानंतर शिवसेना त्यांच्यावर तुटून पडली आहे. कार्यकर्ते-नेते-पदाधिकाऱ्यांनी उत्तरं देऊन झाल्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही थपडीची भाषा केली. आता आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरपार लढाईची भाषा केली आहे. शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असा इशारा देत यायचंय तर या मग, असं बोलावणंच संजय राऊत यांनी लाड आणि राणेंना धाडलं आहे.
मराठवाड्याचे शिक्षण महर्षी
सि. ना. आलुरे यांचं निधन
तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी सि.ना.आलुरे गुरूजी यांचं पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. 1980 साली ते काँग्रेसचे तुळजापूरचे आमदार होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3 नंतर अणदूर या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 6 सप्टेंबर 1932 रोजी आलुरे गुरुजी यांचा जन्म झाला होता.
16 कोटी रुपये जमविले… चिमुकल्या
वेदिका शिंदेचा चटका लावणारा मृत्यू
पिंपरी चिंचवडमधील चिमुकल्या वेदिका शिंदेला Spinal Muscular Atrophy या जनुकीय आजाराने ग्रस्त होती. तिच्या उपचाराकरता लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमवून इंजेक्शनची सोय करण्यात आली. त्यासाठी तिच्या पालकांनी जीवाचे रान केले होते. मात्र वेदिकाचा मृत्यू झाला. 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी वेदिका खेळत असताना तिला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास झाला. रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
SD social media
9850 60 3590