आज दि.१० जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

 ‘ज्ञानेश्वर माऊली’ फेम अभिनेता सांगतोय पांडुरंग आणि Google Maps यांचं अनोखं कनेक्शन!

सध्या सगळीकडे आषाढी वारीचं वातावरण आहे. पांडुरंगाला पाहण्यासाठी आतुर झालेल्या भक्तांची आज पंढरपुरात मांदियाळी असल्याची पाहायला मिळत आहे. आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक कलाकार सुद्धा शुभेच्छा देताना दिसत आहेत. सोनी मराठीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेतील ज्ञानेश्वरांचं पात्र साकारणारा अभिनेता वरुण भागवत पांडुरंगाचं आणि गुगल मॅप्स यांचं अनोखं कनेक्शन शेअर करताना दिसला आहे.वरुण इन्स्टाग्रामवर बराच ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत. ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेमुळे त्याला घराघरात ज्ञानेश्वरांच्या भूमिकेसाठी ओळखलं जातं. वरुणने आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात विठ्ठलाच्या कपाळी असणाऱ्या टिळ्याचं आणि रस्ता दाखवणाऱ्या गुगल मॅप्सचं आगळंवेगळं नातं मांडलं आहे.

अखेर दिल्लीच्या बैठकीत ठरला फॉर्म्युला; गुरुपौर्णिमेला शिंदे सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काल शिंदे आणि फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत काहीच माहिती दिली नव्हती.शिंदे सरकारचा शपथविधी 13 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. गुरुपौर्णिमा असल्याने 13 जुलैला शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीकडे जी खाती होती, ती भाजपकडे जातील तर शिवसेनेकडे जी खाती होती ती एकनाथ शिंदे गटाकडे जातील, असं सांगितलं जात आहे.दिल्लीतील बैठकीत हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. गृह, वित्त, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, आरोग्य, ऊर्जा, ही काँग्रेस राष्ट्रवादीकडे असलेली खाती भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. नगरविकास, परिवहन, पर्यावरण, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उद्योग, मृदू व जलसंधारण यासारखी खाती शिंदे गटाकडे जातील, असंही सांगितलं जात आहे.यापूर्वीही कमी महत्त्वाची खाती मिळाली म्हणून शिवसेनेत नाराजी होती. त्यामुळे पुन्हा तोच फॉर्म्युला राबवणार असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटात नाराजी पसरू शकते.

रस्त्यावर आला तुपाचा पूर, लोकांची भांडे घेऊन गोळा करण्यासाठी गर्दी

देशी तुपानं भरलेला टँकर उलटल्यानं तूप गोळा करण्यासाठी रस्त्यावर एकच गर्दी उडाली होती. या अपघातामध्ये ड्रॅव्हर जखमी झाला. पण, त्याची कुणीही पर्वा केली नाही. अखेर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी त्याला टँकरमधून बाहेर काढत हॉस्पिटलमध्ये नेलं. राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात हा सर्व प्रकार घडला. देशी तुपानं भरलेला टँकर गांधी धाममधून रूद्रपूरला जात होता. त्यावेळी महामार्गावर चालकाचा ताबा सुटला आणि तो उलटला. टँकर उलटताच त्यामधील तूप बाहेर आणि रस्त्यावर वाहू लागले. रस्त्यावर तुपाचं तळं साचलं होतं. ते पाहाताच जवळपासच्या हॉटेल आणि ढाब्यातील कर्मचारी तूप भरण्यासाठी भांडे घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

पक्षाच्या बळकटीसाठी शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये; कोल्हापूरमधील कार्यकारणीबाबत मोठा निर्णय

शिंदे गट आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे शिंदे गटात इनकमिंग वाढत आहे. दुसरीकडे शिवसेनेतून गळतीचे प्रमाण वाढलं आहे. शिवसेना नेमकी कोणाची? यावरुनही आता वाद सुरू झाला आहे. शिवसेनेनी मात्र आता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. जाणाऱ्यांना अडवण्यापेक्षा नवीन लोकांना संधी देण्याचं काम करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी आता शुद्धीकरण मोहिम हाती घेतल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातून याची सुरुवात करण्यात आली आहे.

श्रीलंकेच्या दुर्दशेला चीन किती जबाबदार? पाकिस्तानही त्या वाटेवर? 

आपला शेजारी देश श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. पेट्रोल आणि डिझेलपासून ते दूध आणि इतर खाद्यपदार्थ इतके महाग झाले आहेत की लोकांना खरेदी करणे अशक्य झाले आहे. एकेकाळी पर्यटनासाठी जगात प्रसिद्ध असलेले हे बेट आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, स्वातंत्र्यानंतर श्रीलंका पुन्हा एकदा गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर आहे.

 ‘कळसुबाई’च्या पायथ्याशी पुरामुळे शेकडो पर्यटक अडकले, पोलीस आणि स्थानिक युवकांच्या मदतीने सुखरुप सुटका

पावसाळा सुरु झाला की निसर्गप्रेमींची पावलं आपोआप पर्यटनस्थळांकडे वळतात. महाराष्ट्राचे ऐव्हरेस्ट म्हणून ओळख असलेल्या कळसुबाई शिखराच्या परिसरातही पर्यटकांनी मोठी गर्दी पावसाळ्यात पाहायला मिळत. मात्र निसर्ग कधी त्याचं रुप बदलेल सांगता येत नाही. याचीच प्रचिती काही पर्यटकांना कळसुबाईच्या पायथ्याशी आली. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो पर्यटक अडकले होते. राजूर पोलीस आणि काही स्थानिक युवकांनी पर्यटकांची जीव धोक्यात घालून सुखरुप सुटका केली आहे.

‘मुख्यमंत्र्यांना पुढील 25 वर्षांसाठी शुभेच्छा’, सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंना टोला

आज देवशयनी आषाढी एकादशी आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात प्रति पंढरपूर असलेल्या मंदिराला भेट देत विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी साधलेल्या संवादात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील 25 वर्षासाठी शुभेच्छा, असा टोला त्यांनी लगावला.विठ्ठलाचे आशिर्वाद आणि आभार मानण्यासाठी मी आले आहे. सरकार अस्थिर आहे, दादा म्हणतोय ते खरं आहे. लोक सुरत, गुवाहाटी, गोवा फिरून आले. भारतदर्शन करून आले. बाहेरील राज्यातील पोलीस आपल्या आमदारांना हाताळत होते हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री शिंदेंचा जयंत पाटलांना दणका, 3 हजार कोटींच्या कामांना स्थगिती

मागच्या 8 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच पहिला दणका छगन भुजबळ यांनी मंजुर केलेल्या कामांना स्थगिती दिली तर आता दुसरा दणका त्यांनी जंयत पाटलांना दिला आहे. जलसंपदा विभागाकडून 3 हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती त्याला तातडीने स्थिगीती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ही कामे फक्त एका सांगली जिल्ह्यात होणार होती. जिल्ह्यातील 3000 कोटी रुपयांची सिंचनाची कामे लटकणार आहेत. पाण्याच्या प्रतीक्षेत असलेली शेकडो गावे पाण्यापासून वंचित गावे ‘वंचित’ तच राहण्याचा धोका आहे.

पंढरपुरात रावसाहेब दानवे झाले ‘चहावाले’, दमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: बनवला चहा

आषाढी एकादशीनिमित्तानं लाखो वारकरी आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. राज्यभरातील वेगवेगळ्या दिंडीमधून पायी प्रवास करत हे वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. ऊन, पाऊस, लहरी हवामान यापैकी कशाचीही पर्वा न करता विठूरायाच्या भेटीसाठी हे वारकरी पंढरपुरात मोठ्या भक्तीभावानं दाखल झाले आहेत. ‘याचसाठी केला होता अट्टहास… शेवटचा दिस गोड व्हावा’ अशी या वारकऱ्यांची एकदाशीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेताना भावना असते. आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर या मार्गावर दमलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक जण झटत असतात. पंढरपूर तालुक्यातील शिरसगाव मंडप येथिल सुभाष वाघ यांचे फिरते हॉटेल पंढरपूरमध्ये लागले आहे. वारीमधील प्रत्येक प्रत्येक विसावा, मुक्कामाच्या ठिकाणी ते चहाचं छोटं हॉटेल लावतात. त्यांच्या हॉटेलमध्ये केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी चहा तयार करून वारकऱ्यांना वाटला. आषाढी वारीसाठी पायी आलेल्या दिंडीमधील वारकऱ्यांना भेट घेत त्यांची विचारपूस केली.

कोकणातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, पुढचे दोन दिवस अतिमहत्वाचे

हवामान खात्याकडून राज्यात पुढील 2 दिवस म्हणजे दिनांक 11 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (64 ते 200 मिमी) पावसाचा इशारा देण्यात आले आहे. याचबरोबर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमरावतीचं वातावरण राणा दाम्प्त्याने खराब केलं; यशोमती ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

अमरावतीचं वातावरण खराब करण्यात राणा दाम्पत्याचा हात असल्याचा आरोप माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा राणा दाम्पत्याने इव्हेंट केला, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या. याशिवाय त्यांनी राणा दाम्पत्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राणा दाम्पत्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असा प्रकार आहेत. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता होता, असा खळबळजनक दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कथित सूत्रधार इरफान खान याचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्याशी संबंध असल्याचं उघड झालं आहे, असंही त्या म्हणाल्या.

सकाळी-सकाळी ‘शिव-पार्वती’ला भांडताना पाहून लोक संतापले, थेट पोलीस ठाण्यातच खेचलं

फिल्ममेकर लीना मणिकेलाई यांचा माहितीपट कालीच्या पोस्टवरील वादात आसाममधील एका तरुण-तरुणीला शिव-पार्वतीच्या वेशात भांडण करणं महागात पडलं आहे. हिंदूवादी संघटनांनी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर शिवाच्या रुपात असलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला जामीनावर सोडण्यात आलं आहे. त्याला नोटीसही देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिव-पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या तरुण-तरुणींनी सांगितलं की, ते कलाकार आहेत. आणि सर्वसामान्यांच्या मुद्द्यांवर लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी हे क्रिएटिव्ह नाटक केलं होतं.

लोणावळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी; टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट धुक्यात हरवले

विकेंड असल्याने लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट येथे वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यानंतर, भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याची बातमी पसरताच लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी झाली. टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट येथे धुक्याची चादर पसरली त्याचा आल्हाददायी अनुभव पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह अनुभवला आहे.

गोव्यातील काँग्रेसच्या बैठकीत ३ आमदार गैरहजर; भाजपाच्या संपर्कात असल्याची शक्यता

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाबाबत रणनिती बनवण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीला काँग्रेसच तीन आमदार गैरहजर राहिल्यामुळे हे आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच काँग्रेस गटात मतभेद असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात पावसाचा कहर! 24 तासांत 9 जणांचा मृत्यू, 838 घरांची पडझड

राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने आता आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होतोय, तिथं परिस्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे. यापैकी गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे.

sharash pawar/sdnewsonline.com

‘औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आम्हाला कल्पनाही नाही’, शरद पवारांनी झटकले हात

महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराच्या नामांतरणाचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव असं करण्यात आलं. ठाकरे सरकारच्या या मत्रिमंडळ निर्णयाला औरंगाबादमधील काही स्थानिकांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचंदेखील समर्थन नसल्याची शक्यता आहे. कारण शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाबाबत आपल्याला कल्पनाच नव्हती, असं मोठं विधान केलं आहे. याशिवाय महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोगॅममध्ये याबाबत काहीच ठरलेलं नव्हतं. निर्णय घेण्यात आला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी आपले म्हणणे मांडले होते. पण मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम मानला जातो. म्हणून उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचा नामांतरणाचा निर्णय घेतला आणि जाहीर केला, असा धक्कादायक खुलासा शरद पवार यांनी केला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.