नुकत्याच झालेल्या एका काश्मिरी पंडिताच्या हत्येप्रकरणातील दोन दहशतवादी मंगळवारी पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका मशिदीत झालेल्या या चकमकीत लष्कराचा एक जवानही शहीद झाला.मशिदीच्या आत किमान दोन सशस्त्र दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी पदगामपोरा गावातील परिसराला वेढा घातला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.रविवारी एका काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर ही चकमक पहाटे १ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास घडली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की दोन स्थानिक अतिरेकी एका मशिदीत लपलेले असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी अत्यंत संयमाने कारवाई केली. मशिदीचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली गेली. चकमकीदरम्यान, ‘५५ राष्ट्रीय रायफल्स’च्या एका जवानाच्या मांडीला गोळी लागली. मात्र, त्याची मुख्य धमनीच फुटल्याने मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाला व हा जवान वाचू शकला नाही.
रविवारी एका बँकेच्या ‘एटीएम’चे सुरक्षारक्षक संजय शर्मा या पंडित समाजाच्या नागरिकाची पुलवामामधील अचन येथील त्यांच्या घरापासून केवळ शंभर मीटरवर दहशतवाद्यांनी गोळय़ा घालून हत्या केली होती. शर्मा यावेळी स्थानिक बाजारपेठेत जात होते. गंभीर जखमी शर्मा यांना प्रवाशांनी तातडीने रुग्णालयात नेले पण दुर्दैवाने तोपर्यंत उशीर झाला होता. ठार झालेला दहशवादी भट हा आधी हिजबुल मुजाहिदिनसाठी काम करत होता. सध्या तो ‘द रेझिस्टंट फ्रंट’साठी (टीआरएफ) काम करत होता, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली.
अशी झाली कारवाई
या चकमकीचा तपशील सांगताना, हे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, की या दहशतवाद्यांपैकी आकिब मुस्ताक भट हा दहशतवादी मशिदीच्या आवारात मारला गेला. तर दुसरा दहशतवादी पुलवामाजवळील त्रालचा रहिवासी असून, त्याचे नाव एजाज अहमद भट आहे. त्याने चकमकीदरम्यान खिडकीतून उडी मारली व मशिदीजवळच्या घरात आश्रय घेतला. तांत्रिक देखरेखीद्वारे त्याचे स्थान शोधले गेले व सुरक्षा दलांनी त्याला घराबाहेर पडू न देता तेथेच चकमकीत त्याला ठार केले.